बिबवेवाडी येथील काँग्रेस पक्षाचे बंद केलेल्या संपर्क कार्यालयात त्यांच्याच पक्षातील दोन गटात समोवारी सायंकाळी मारामारी झाली. त्या वेळी त्यांच्याकडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. मात्र, याबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथे काँग्रेसचे संपर्क कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीर असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे झाली होती. एक आठवडय़ापूर्वी हे कार्यालय बंद करण्यात आले होते. या ठिकाणी सोमवारी सायंकाळी काँग्रेसच्या दोन गटात वादावादी होऊन मारामारी झाली. त्यानंतर येथे तोडफोड झाली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. एम. तोडकर यांनी सांगितले की, अशी घटना घडल्याचा पोलीस ठाण्यात फोन आला होता. त्यानुसार घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर हे कार्यालय बंद होते. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही.