राष्ट्रवादीच्या पिंपरी बालेकिल्ल्यातील तीनही विधानसभेच्या जागा जिंकण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची व्यूहरचना असतानाच काँग्रेसनेही या जागांवर दावा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आदेशानुसार काँग्रेसने पिंपरी, चिंचवड आणि भोसरीसाठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागावाटपात पिंपरी व भोसरी राष्ट्रवादीकडे तर चिंचवड काँग्रेसकडे आहे. काँग्रेसची ताकद कमी असल्याचे सांगत राष्ट्रवादीने चिंचवड मतदारसंघावरही दावा केला असून त्याची मागणी यापूर्वीच सुरू केली आहे. अजितदादांनाही शहरातून तीनही आमदार राष्ट्रवादीचे हवे आहेत, त्यानुसार त्यांची व्यूहरचना  आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये राज्यभरातील जागावाटपावरून कलगीतुरा सुरू आहे, त्याचे पडसाद पिंपरीतही उमटत आहेत. सक्षम उमेदवार नसतानाही काँग्रेसने तीनही मतदारसंघांवर दावा करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली, हा त्याचाच एक भाग आहे. पक्षाचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी जिल्हाध्यक्षांना पत्र दिले असून ११ ऑगस्टपूर्वी इच्छुकांचे अर्ज प्रदेश कार्यालयात पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्यक्षात िरगणात उतरण्यासाठी कितपत इच्छुक पुढे येतील, याविषयी साशंकता आहे. गेल्या वेळी चिंचवड मतदारसंघातून शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी निवडणूक लढवली होती. यंदा ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी पक्षत्याग केल्यास प्रदेश सचिव सचिन साठे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, माजी नगरसेवक बाबा तापकीर यांची नार्वे चर्चेत राहतील. पिंपरीत काँग्रेसची ताकद चांगली आहे. मात्र, तो मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. माजी उपमहापौर गौतम चाबुकस्वार, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, गौतम आरकडे, अॅड. सुशील मंचरकर आदींची नावे चर्चेत आहेत. भोसरीसाठी माजी महापौर हनुमंत भोसले, नगरसेवक जालिंदर िशदे, राहुल भोसले, शिक्षण मंडळाचे सदस्य विष्णूपंत नेवाळे यांच्याकडे उमेदवार म्हणून पाहिले जाऊ शकते. तथापि, अद्याप चित्र अस्पष्ट आहे. या संदर्भातील, अंतिम निर्णय अजितदादा तसेच काँग्रेसचे संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील चर्चेनंतर होईल. तोपर्यंत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसकडून वातावरण निर्मिती होईल, असे दिसते.