लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच चाणाक्ष राजकीय मंडळींनी या वातावरणाचा फायदा घेत विधानसभा निवडणुकीची ‘फिल्डिंग’ लावली आहे. लोकसभा उमेदवाराच्या पडद्याआड विधानसभेची रंगीत तालीम सुरू असल्याचे दिसून येते.
मावळ लोकसभेतील चिंचवड, पिंपरी तर शिरूर लोकसभेतील भोसरी विधानसभेच्या रिंगणात हे चित्र प्रकर्षांने दिसून येते. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे लोकसभेसाठी आमने-सामने आहेत. बारणे अथवा जगताप यांच्यापैकी कोणीही खासदार झाले, तरी त्यापुढचे गणित तयार ठेवून चिंचवड विधानसभेसाठी बरीच मंडळी कामाला लागली आहेत. जगताप व बारणे यांच्या आजूबाजूला आमदार होऊ इच्छिणाऱ्यांची गर्दी आहे. सांगवी ते रावेतच्या पट्टय़ातील अनेक स्वयंघोषित नेते आमदारकीचे दावेदार असून विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच ते लोकसभेकडे पाहत आहेत. पिंपरीतही तेच चित्र आहे. आमदार अण्णा बनसोडे यांच्या जागेवर राष्ट्रवादीच्याच मंडळींचा डोळा असून त्यात जगदीश शेट्टी आघाडीवर आहेत. विरोधी पक्षातील अमर साबळे, सीमा सावळे, चंद्रकांत सोनकांबळे आदींची पिंपरीसाठी वेगवेगळी गणिते आहेत. राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचार बैठकीत काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी, नार्वेकरांना खासदार करा व मला आमदार करा, असे सांगत आपली सुप्त इच्छा बोलून दाखवली. लोकसभेनंतर आपल्याला मोकळे रान कसे मिळेल, या दृष्टीने राष्ट्रवादीतील ‘जोडी’ची व्यूहरचना सुरू आहे. भोसरीच्या राजकारणात बरीच उलथापालथ होणार असून त्याचे संकेत लोकसभेच्या निमित्ताने दिसून येत आहेत. आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीचे शिरूरचे उमेदवार देवदत्त निकम यांना ‘हायजॅक’ केले व निकमांच्या प्रचारात विलासराव आपल्या निवडणुकीची तयारी करत आहेत, असा सूर राष्ट्रवादीचेच पदाधिकारी व्यक्त करत आहेत. शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या छत्रछायेखाली सुलभा उबाळे स्वत:चे उद्दिष्ट साध्य करू पाहत आहेत. या आणि यांसारख्या अनेक घडामोडी शहरातील तीनही मतदारसंघांत होताना दिसत आहेत.