स्मार्ट सिटीसाठी विशेष हेतू कंपनी स्थापनेबाबतचा निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेलय़ा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी सर्व नियम धुडकावून देण्यात आले. विशेष हेतू कंपनी स्थापनेसाठीची सभा काँग्रेस आणि मनसेने एकत्र येऊन गणसंख्येअभावी तहकूब केली. मात्र हे करत असताना महापौर आणि उपमहापौरांचा अपमान सभेत झाला.
विशेष हेतू कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल- एसपीव्ही) स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेची वेळ सकाळी अकराची होती. त्यानुसार विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, काँग्रेसचे अभय छाजेड, कमल व्यवहारे आणि मनसेचे दोन असे पाच सदस्य सभागृहात वेळेत उपस्थित होते. सभेची वेळ झाली असून महापौर, आयुक्त आणि अधिकारी सभागृहात नाहीत असे सांगून शिंदे यांनी नगरसचिवांचे लक्ष वेधले. त्यानंतर मनसेचे किशोर शिंदे यांना सभापती करून कामकाज सुरू करण्याची उपसूचना त्यांनी मांडली. ती मंजूर झाल्यानंतर सभापतींनी सभेचे कामकाज सुरू करण्याची सूचना नगरसचिवांना केली. या घडामोडी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाचे गटनेता गणेश बीडकर सभागृहात आले. त्यांनी सभापती नेमण्याला विरोध केला. तोपर्यंत सत्ताधारी पक्ष आणि मनसेचे काही सदस्य सभागृहात आले आणि सभेचे कामकाज सुरू झाले.
हा गोंधळ सुरू असतानाच उपमहापौर आबा बागूल हेही सभागृहात येऊन पोहोचले. मात्र त्यांना महापौरांच्या आसनावर बसू देण्यात आले नाही.  याचवेळी सभागृहात गणसंख्या नसल्याचे सांगत सभा तहकूब करण्याची उपसूचना काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनी मांडली.
सभापतींनी गणसंख्या मोजण्याचा आदेश नगरसचिवांना दिला. तेव्हा सभागृहात पुरेशी गणसंख्या नव्हती. त्यामुळे सभा तहकूब करण्याचा आदेश सभापतींनी दिला. त्यावर ही सभा महिनाभर पुढे ढकलण्याची उपसूचना विरोधी पक्षनेते आणि मनसेच्या गटनेत्यांनी मांडली. मात्र, पुढील तीन दिवसात सभा घेण्याची मागणी बीडकर यांनी केली. अशा प्रकारे कामकाज योग्य नाही. महापौर येत आहेत, त्यामुळे कामकाज थांबवा अशीही मागणी त्यांनी केली. त्यावर सभा महिनाभर पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेस आणि मनसेने केली. तहकुबी वाचण्याची मागणी त्यांनी केली.
या घडामोडी सुरू असतानाच महापौर दत्तात्रय धनकवडे सभागृहात आले. त्यानंतर कामकाज सुरू ठेवण्याची मागणी बीडकर आणि सभागृहनेता शंकर केमसे यांनी केली. मात्र, सभा तहकूब झाल्यामुळे कामकाज होणार नसल्याचे काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनी सांगितले. त्यावर शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता सभा घेण्याची उपसूचना राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली व ती महापौरांनी मंजूर केली.

महापौर, उपमहापौर पदाची आज निवडणूक
महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता होणार असून त्यानंतर एसपीव्ही स्थापन करण्यासाठीची सभा सायंकाळी पाच वाजता होणार आहे. महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशांत जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उपमहापौर पदासाठी काँग्रेसने मुकारी अलगुडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महापौरपदासाठी मनसेकडून वसंत मोरे आणि उपमहापौरपदासाठी अस्मिता शिंदे यांनी अर्ज भरला. भारतीय जनता पक्षातर्फे महापौरपदासाठी अशोक येनपुरे यांनी आणि उपमहापौरपदासाठी वर्षां तापकीर यांनी अर्ज भरला आहे. तसेच शिवसेनेचे सचिन भगत यांनी महापौरपदासाठी आणि योगेश मोकाटे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे.