पिंपरी पालिका शिक्षण मंडळाचे सभापती फजल शेख यांची निर्धारित मुदत संपल्यानंतरही स्व:पक्षातील नेत्यांच्या छुप्या पाठबळामुळे ते राजीनामा देत नाहीत म्हणून सर्व सदस्य विरूध्द सभापती असा संघर्ष रंगला आहे. त्यातच, विविध कारणे पुढे करून सभापतींची निवडणूक पुढे ढकलण्याच्या राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रयत्नांना शालेय शिक्षण उपसचिवांनी जोरदार झटका दिला. सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यास कोणताही अडथळा नसल्याचा स्पष्ट अभिप्राय राज्याच्या विधी व न्याय विभागाने महापालिकेला दिला आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुदत संपलेल्या फजल शेख यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती, तथापि, त्यांनी तो दिला नाही. वेगवेगळी तांत्रिक कारणे त्यांनी सांगितली. आपला राजीनामा घेतल्यास पुन्हा राष्ट्रवादीचा सभापती होणार नाही, असे चित्रही रंगवले. त्यामुळे शेख यांचा राजीनामा लांबणीवर पडत गेला, त्यातून सर्व सदस्य अस्वस्थ झाले. बरीच ओढाताण झाल्यानंतर आता सभापतींना कोणत्याही परिस्थितीत काम करू द्यायचे नाही, अशा मन:स्थितीत सदस्य आले आहेत. मंडळाची निवडणूक लावता येणार नाही, असा कांगावा शेख व त्यांच्या पाठीराख्यांनी घेतला होता, त्यावरून आयुक्तांनी शिक्षण विभागाकडून अभिप्राय मागवला. त्यानुसार, निवडणूक घेण्यास कोणतीही हरकत नसल्याचे पालिकेला कळवण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षण मंडळांना त्यांची मुदत संपेपर्यंत पूर्वीचाच कायदा लागू आहे. मंडळाचा कालावधी चार महिन्यांपेक्षा जास्त असल्यास निवडणूक घेण्यास हरकत नसल्याचे अभिप्रायात नमूद करण्यात आले आहे. मंडळाची दोन वर्षांची मुदत शिल्लक आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.