|| विद्याधर कुलकर्णी

राजकीय पक्षांच्या सांस्कृतिक सेलतर्फे सादरीकरण

निवडणुकीमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत आपली भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पदयात्रा, प्रचारफेरी, दुचाकी रॅली या पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या प्रचाराबरोबरच पथनाटय़ सादरीकरणालाही प्राधान्य दिले जात आहे. एका क्षणात माहिती पोहोचविण्याची क्षमता असलेल्या समाजमाध्यमांच्या युगामध्येही पथनाटय़ांचे महत्त्व अबाधित असून पथनाटय़ामध्ये सहभाग घेणाऱ्या कलाकारांची साधारणपणे दररोज एक हजार रुपयांची बेगमी होते.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघ मोठा असल्याने मतदारांपर्यंत उमेदवाराची आणि पक्षाची भूमिका पोहोचविण्यासाठी पथनाटय़ सादरीकरणाचा मार्ग निवडला जातो. पूर्वी हौशी कलाकारांचा संच ही पथनाटय़े करीत असे. त्यांना मानधन बऱ्यापैकी मिळायचे. मात्र, सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे सांस्कृतिक विभाग आता प्रभावीपणे कार्यरत आहेत. या विभागमुखाने नियुक्त केलेल्या कलाकारांच्या संचामार्फत पथनाटय़ांचे सादरीकरण केले जाते. लोकसभेला उमेदवार कमी असल्याने त्याचा तोटा कलाकारांना होतो. त्यातुलनेत विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये पथनाटय़ सादर करणाऱ्या कलाकारांना मागणी असते, असे निरीक्षण संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन यांनी नोंदविले.

दहा-बारा कलाकारांचा संच दिवसभरात २० ते २५ मिनिटांच्या पथनाटय़ांचे पाच-सहा प्रयोग करतो. मंडई, उद्याने, गर्दी असलेले मोक्याचे चौक अशा ठिकाणी पथनाटय़ांचे सादरीकरण होते. हौशी कलाकार, नाटय़शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींची निवड केली जाते. पांढरा सलवार-कुर्ता, डोक्यावर पक्षाच्या ध्वजाची टोपी आणि गळ्यामध्ये पक्षाच्या चिन्हाचे उपरणे अशा पेहरावात हे कलाकार अभिनयासह पथनाटय़ सादर करतात. पोवाडा, लोकगीतांतील गाणी, गण-गवळण, बतावणी अशा माध्यमातून पक्षाचे चिन्ह आणि उमेदवाराचा प्रचार प्रभावीपणे केला जातो. या हौशी कलाकारांना साधारपणे सातशे ते एक हजार रुपये दिले जातात. तर, संवादिनी आणि ढोलकीवादन करणारे कलाकार व्यावसायिक असल्याने त्यांना दीड हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. आठ-दहा दिवसांमध्ये हे कलाकार किमान दहा हजार रुपयांची बेगमी करतात, असे महाजन यांनी सांगितले. आचारसंहितेच्या धसक्यामुळे अनेकदा मानधन कमी दिल्याचे उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखविले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

केवळ राजकीय पक्षांचे उमेदवारच नव्हे तर, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनातर्फे पथनाटय़ाद्वारे मतदान जनजागृती केली जाते. निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवून सक्षम, चारित्र्यवान आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधीची मतपेटीद्वारे निवड करणे  हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे मतदारांनी न चूकता आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन ‘माझे मत, माझा हक्क’ या पथनाटय़ाव्दारे गरवारे महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले. मतदारांमध्ये जागृती  करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वीप’ योजनेअंतर्गत या पथनाटय़ाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. पुणे लोकसभेचे स्वीप समन्वयक सुभाष बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य पी.बी. बुचडे, विभागप्रमुख विनय चाटी, स्वीप सहाय्यक यशवंत मानखेडकर, बाळासाहेब माळी या वेळी उपस्थित होते.

पथनाटय़ाद्वारे मतदान जनजागृती

माझे मत माझा हक्क या पथनाटय़ाद्वारे विद्यार्थ्यांकडून हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येते. संगीत दिग्दर्शक के. सी. लॉय यांनी या पथनाटय़ासाठी तयार केलेले ‘अपना मत दोगे तो होगा उद्धार, अपनेही कल पे तू कर ले ये उपकार’ या गीताद्वारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात येते. या अभियानाअंतर्गत २० एप्रिलपर्यंत शहरातील विविध महाविद्यालये, प्रेक्षणीय स्थळे, वारसा हक्क स्थळे, गर्दीची महत्त्वाची ठिकाणे, बाजारपेठा येथे ही पथनाटय़े सादर केली जाणार आहेत.