पुण्याच्या वरवर ‘चौकोनी’ दिसणाऱ्या निवडणुकीत चौकोनाबाहेरचे ‘ते’ देखील हिरिरीने आपला प्रचार करत आहेत. त्यांच्यातले कुणी स्वत:च्या चारचाकी गाडीतून स्वत:च्या कुटुंबातील केवळ ७ जणांसह रस्त्यावर उतरले आहे, कुणी मोजक्या कार्यकर्त्यांसह घरोघरी पत्रके वाटते आहे, तर कुणी दुपारच्या वेळी एकटेच दुचाकीवरून फिरून नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ते’ आहेत पुण्याचे अपक्ष उमेदवार!
यंदा पुण्यातून उभ्या राहिलेल्या २९ उमेदवारांपैकी तब्बल १९ उमेदवार अपक्ष आहेत. या १९ जणांपैकी फारतर एखाद्-दोन जणांना आपण प्रत्यक्ष प्रचार करताना पाहिले असेल. पण म्हणून अपक्ष प्रचारात नाहीतच असे मुळीच नाही. त्यांचाही प्रचार कार्यक्रम ठरलेला आहे आणि ठराविक भागात का होईना ते तो राबवत आहेत. यातील काही अपक्ष उमेदवारांशी संवाद साधला असता त्यांच्या प्रचाराचे सूत्र आणि त्याबाबत त्यांना वाटत असलेला आत्मविश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
अपक्ष उमेदवार अजय पैठणकर ‘गॅस सिलेंडर’ या निवडणूक चिन्हासह प्रचार करत आहेत. त्यांचे कुटुंब आणि मित्रमंडळी असे केवळ १५- २० जण त्यांच्या प्रचारात उतरले आहेत. निवृत्त झालेले आणि पूर्वी स्वत: कार्यकर्ते म्हणून काम केलेले पैठणकर दुपारच्या वेळी एकटेच दुचाकीवरून टोपी घालून, सिलेंडरचे चित्र गळ्यात अडकवून प्रचारासाठी फिरतात. ते म्हणाले, ‘‘मी पूर्वी भेळभत्त्यावर कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. आता तसे कार्यकर्ते उरलेच नाहीत. गणेश मंडळे बळकट करणे आणि खरा कार्यकर्ता तयार करणे हा माझा एक प्रमुख मुद्दा आहे.’’
‘शिवणयंत्र’ हे निवडणूक चिन्ह असलेले अपक्ष मंचक कराळे कीर्तनकार आहेत. ते महाराष्ट्र क्रांती सेना या संघटनेचे काम करतात. कमीत कमी खर्च व्हावा यासाठी प्रचारात पत्रके वाटणे आणि पदयात्रा यालाच महत्त्व दिल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पुढारी आणि सामान्य माणूस यांच्यातला फरक लोकांना जाणवून द्यायचा आहे, असे ते सांगतात.
कार्पेटचा व्यवसाय करणारे अपक्ष आझम मणियार शिक्षणाच्या बाजारीकरणाचा मुद्दा घेऊन उतरले आहेत. ‘कपाट’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. ते म्हणाले, ‘‘माझा हा निवडणुकीचा पहिलाच अनुभव आहे. केवळ बदल हवा म्हणून मी स्वत: उभे राहण्याचा निर्णय घेतला.’’
‘बॅट’ या निवडणूक चिन्हासह लढणारे अपक्ष शशिकांत ओव्हाळ स्वत:च्या मारूती गाडीतून प्रचार करतात. त्यांच्या कुटुंबातील ७ जणांची प्रचार टीम आहे. ‘झोपडपट्टय़ा आणि सोसायटय़ांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण सोसायटय़ांमध्ये लोक प्रचारासाठी सहजासहजी येऊ देत नाहीत,’ असे त्यांनी सांगितले.
अपक्ष अशपाक शेख भंगार मालाचा व्यवसाय करतात. ‘दूरदर्शन संच’ हे त्यांचे चिन्ह आहे. ‘राजकीय पक्ष प्रचारात पैशांची उधळण करतात. तसा प्रचार सामान्य माणसाला शक्य नाही. पण पदयात्रा आणि घरोघरी भेटी देऊन जमेल तेवढे करतो,’ असे ते म्हणाले.
‘कॅमेरा’ हे निवडणूक चिन्ह असलेले बिभीषण देवकुळे हे शेतकरी आहेत. घरातले लोक आणि इतर काही कार्यकर्ते यांच्यासह ते प्रचार करतात.
स्वत:चा व्यवसाय करणारे आणि ‘हंडी’ या चिन्हासह उतरलेले अपक्ष सिमकुमार खिरिड प्रचारासाठी फेसबुक आणि इ-मेलही वापरतात. ‘प्रसारमाध्यमे फक्त चारच पक्षांना पुढे आणतात पण सध्या पुण्यात कोण निवडून येईल हे खात्रीने सांगता येणार नसल्याचीच परिस्थिती आहे,’ असे ते सांगतात.