मावळ लोकसभेच्या जागेसाठी शिवसेनेत ‘पेच’ असताना राष्ट्रवादीने मावळचे नाव गुलदस्त्यात ठेवल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे, ‘आप’तर्फे मावळसाठी पिंपरी पालिकेचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आता मावळची लढत बहुरंगी व रंगतदार होणार आहे.
राष्ट्रवादीने गुरुवारी १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात मावळचा समावेश नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कारभारी’ असलेल्या पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळसाठी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी नन्नाचा पाढा लावल्यानंतर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव निश्चित मानले जात होते. माजी मंत्री मदन बाफना, माजी महापौर संजोग वाघेरे यांचीही नावे चर्चेत होती. तथापि, यापैकी कोणाचेही नाव गुरुवारी जाहीर झाले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मतदारसंघाची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने मावळ राखून ठेवण्यात आल्याचे वरकरणी सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात वेगळेच कारण असल्याची शंका व्यक्त केली जाते. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा विषय शासनदरबारी प्रलंबित आहे. हा निर्णय न झाल्यास त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. बांधकामे नियमित न झाल्यास मावळची उमेदवारी स्वीकारणार नाही, अशी अट आमदार जगतापांनी पक्षाध्यक्ष शरद पवार व अजितदादांना घातली होती. वर्षभरापासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे या विषयावर ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. जगतापांची उमेदवारी जाहीर केली आणि निर्णयच झाला नाही तर अडचणीची परिस्थिती निर्माण होईल म्हणूनच मावळचा उमेदवार गुलदस्त्यात ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
शिवसेनेत खासदार गजानन बाबर व नगरसेवक श्रीरंग बारणे यांच्यात काटय़ाची स्पर्धा आहे. नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची, असा पक्षासमोर पेच आहे. उद्धव ठाकरे यांनी बाबर व बारणे तसेच स्थानिक नेत्यांशी अनेकदा वैयक्तिक चर्चा केली. योग्य वेळी उमेदवार जाहीर करू. देईल त्या उमेदवारास निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यापूर्वीच केले आहे. अशातच, विविध संस्था, संघटनांशी संबंधित असलेले चळवळीतील कार्यकर्ते भापकर मावळच्या रिंगणात आल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे. तूर्त, शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ हाच सर्वत्र चर्चेचा विषय आहे.