कमीत कमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणून राजकीय नेत्यांनी आता ध्वनिमुद्रित आवाज ऐकवून प्रचार करण्यावर भर दिला आहे. मोबाइलवर रिंग वाजताच कोणताही माणूस फोन उचलतो आणि समोरून ‘मी अमुक बोलतोय. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मलाच निवडून द्यावे,’ असे आवाहन या ‘रेकॉर्डेड व्हॉइस कॉल’च्या माध्यमातून केला जातो.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उमेदवारांना प्रत्येक मतदाराची भेट घेऊन त्याला आवाहन करणे अवघड झाले आहे. त्यातच प्रचाराची रणधुमाळी संपुष्टात येण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या उत्पादनांची माहिती ग्राहकांना देणाऱ्या मार्केटिंग कंपन्यांच्या जाहिरातीच्या धर्तीवर थेट मतदाराच्या कानापर्यंत पोहोचण्याची किमया साधण्यासाठी या मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात झाली आहे. कंपन्या ध्वनिमुद्रित आवाजाचा वापर करून ग्राहकापर्यंत ही माहिती देतात. लोकशाहीमध्ये मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी ‘रेकॉर्डेड व्हॉइस कॉल’चा वापर करण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे.
व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचता येते, ही बाब लोकसभा निवडणुकीने अधोरेखित केली. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीतही या माध्यमांबरोबरच प्रत्येक उमेदवाराला घरोघरी पोहोचता येणे शक्य होत नसल्यामुळे ‘रेकॉर्डेड व्हॉइस कॉल’ या माध्यमाचाही वापर केला जात आहे. सुभाष जगताप, बापू पठारे, प्रशांत बधे आणि सचिन तावरे या उमेदवारांनी रेकॉर्डेड व्हॉइस कॉल म्हणजेच ध्वनिमुद्रित आवाजाचा वापर केला आहे. युती आणि आघाडीमध्ये फाटाफूट झाल्यानंतर काही उमेदवारांना अचानकपणे निवडणुकीला सामोरे जावे लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांची आणि प्रचार साधनांची जमवाजमव करण्याबरोबरच थोडय़ा कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे खडतर आव्हान पेलण्यासाठी रेकॉर्डेड व्हॉइस कॉल माध्यमाला पसंती दिली जात आहे.