पुणे जिल्ह्य़ात पक्षावर निष्ठा दाखवणाऱ्या उमेदवारांना खासदारकीचे फळ मिळाल्याचे, तर पक्ष सोडणाऱ्यांना किंवा निवडणुकीच्या आधी पक्षात सक्रिय होणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे चित्र या वेळच्या निवडणुकीत पाहायला मिळाले आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणे या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची ‘ऑफर’ नाकारली आणि पदरात विजय पाडून घेतला. त्याच वेळी पक्ष सोडणारे लक्ष्मण जगताप, राहुल नार्वेकर आणि निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात सक्रिय होणारे दीपक पायगुडे, विश्वजित कदम यांना मतदारांनी नाकारले.
आताची लोकसभा निवडणूक अनेक गोष्टींमुळे गाजली. राज्याप्रमाणेच पुणे जिल्ह्य़ातही महायुतीच्या उमेदवारांनी वर्चस्व गाजवले. जिल्ह्य़ातील विधानसभेच्या २१ पैकी १८ मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. अपवाद आहे तो केवळ बारामती, इंदापूर आणि भोर या तीन मतदारसंघांचा. याचबरोबर पक्ष सोडणारे उमेदवार पराभूत झाल्याचे पाहायला मिळाले.
मावळ मतदारसंघात खूपच उलथापालथ झाली. अनधिकृत बांधकामांच्या मुद्दय़ावर लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) तिकिटावर निवडणूक लढवली. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांचाही धुव्वा उडाला. राजकीय विश्लेषकांनुसार, जगताप हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले असते तर त्यांच्या विजयाची शक्यता अधिक होती. याच मतदारसंघात शिवसेनेचे तिकीट गजानन बाबर की श्रीरंग बारणे यांना मिळणार हे पक्के होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बारणे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचे आमंत्रण दिले होते. जगताप हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक नव्हते, तेव्हा खुद्द अजित पवार यांनी ही चाचपणी केली होती. इतकेच नव्हे तर शेकापचे जयंत पाटील यांनीसुद्धा जगताप यांना पाठिंबा देण्यापूर्वी बारणे यांना आपल्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याबाबत सुचवले होते. मात्र, बारणे शिवसेनेच्या तिकिटावरच निवडणूक लढले आणि ते विजयी झाले.
शिरूरचे खासदार आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे व पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी यासाठी गेली दोन वर्षे प्रयत्न सुरू होता. याबाबत शरद पवार, अजित पवार यांच्याशी त्यांची बोलणीसुद्धा झाली होती. मात्र, आढळराव यांनी तडकाफडकी निर्णय न घेता सबुरी दाखवली आणि विषय ताटकळत ठेवला. अखेर मोदींचा प्रभाव वाढत असल्याचे दिसताच पक्ष न सोडता शिवसेनेच्या तिकिटावरच निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
पुणे मतदारसंघात भाजपचे अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे विश्वजित कदम आणि मनसेचे दीपक पायगुडे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. कदम यांचा पुण्याच्या राजकारणाशी कधीच संबंध आला नव्हता, तर पायगुडे यांनी राजकारणातून विश्रांती घेतली होती. निवडणुकीच्या तोंडावर ते पुण्यात सक्रिय झाले होते. या दोघांना मतदारांनी नाकारले.