गेल्या अनेक दिवसांपासून ज्या घोषणेची प्रतीक्षा होती ती विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आता कालबद्ध कार्यक्रम मिळाला असून त्यानुसार पक्षांची यंत्रणा एक-दोन दिवसांत सक्रिय होईल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तसेच भाजप, शिवसेना, आरपीआयची महायुती यांच्यातील जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला, तरी राजकीय पक्षांना प्रचाराला मात्र सुरुवात करावी लागणार आहे.
निवडणुका जाहीर झाल्यामुळे पुण्यातील राजकीय पक्षांनी पुढील कार्यक्रमाची आखणी कशा पद्धतीने केली आहे, याबाबत शहराध्यक्षांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली.
खासदार अनिल शिरोळे (शहराध्यक्ष, भाजप)
निवडणूक आज जाहीर झाली असली, तरी आमची तयारी झालेली आहेच. आम्ही पूर्ण सज्ज आहोत. लोकसभा निवडणुकीत केलेल्या तयारीचा फायदा पक्षाला या निवडणुकीत होत आहे. त्या वेळी बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. ज्या भागात ही यंत्रणा नव्हती, तेथेही आम्हाला कार्यकर्ते मिळाले आहेत. गेले दोन महिने पक्षाचे पूर्ण लक्ष निवडणुकीकडेच आहे. पुढच्या आठवडय़ात पंकजा मुंडे पालवे यांची संघर्ष यात्रा पुण्यातून जाणार आहे. त्या बरोबरच १८ सप्टेंबरला (गुरुवारी) पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच येथे पक्षाचा मेळावा होत आहे. त्यामुळे निवडणूक तयारीला वेग येईल. उमेदवारांबाबत पक्ष निर्णय घेईल. आमच्यासाठी चांगले वातावरण आहे आणि आम्हीजिंकू असा कल आहे. त्यासाठी आवश्यक मेहनत आता घ्यावी लागेल.
खासदार वंदना चव्हाण (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
आमची पक्षबांधणी आणि संघटनात्मक कार्यक्रम सातत्याने सुरू आहेत. त्यात खंड पडलेला नाही. मतदारसंघनिहाय बैठकाही सुरू आहेत. लोकसभेत जरी आम्ही पुण्यात विजय मिळवू शकलो नाही, तरीही आम्ही पक्ष म्हणून त्या वेळी चांगले काम केले होते. विधानसभेचे उमेदवार जाहीर झाले की लगेचच पुन्हा प्रचार जोरात सुरू होईल. आमच्यासमोर निश्चितच आव्हान आहे. केलेल्या कामांचे मार्केटिंग करण्यात गेल्या वेळी आम्ही कमी पडलो. या वेळी मात्र अगदी छोटय़ा घटकांपर्यंत पोहोचून विकासाची जी कामे आम्ही केली ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी सोशल नेटवर्कचा वापर निश्चितपणे केला जाईल. मुख्यत: मतदारांनी जागरूक राहून मतदान करावे हा संदेश देण्यावर आमचा भर राहील.
अभय छाजेड (शहराध्यक्ष, काँग्रेस)
विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता दिसत आहे. आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच बाकी सर्व गोष्टी स्पष्ट होणार असल्या, तरी काँग्रेस पक्षाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिस्तबद्ध यंत्रणा राबविण्याची तयारी ठेवली आहे. आघाडीबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार असून जागावाटपाचे सूत्र देखील ठरेल. एखाद्या मतदारसंघाच्या अदलाबदलीबाबतचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरच होणार असून आम्ही आघाडी धर्माचे पालन करू. नुकतीच लोकसभेची निवडणूक झालेली असल्यामुळे ब्लॉक आणि बूथ कमिटय़ा पुन्हा कार्यरत केल्या जातील. उमेदवारी जाहीर झाल्यावरच प्रचाराला सुरुवात होणार असली, तरी पक्षांतर्गत बैठका सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. नवरात्रोत्सवापासून प्रत्यक्ष प्रचारास प्रारंभ होईल.
श्याम देशपांडे (शहरप्रमुख, शिवसेना)
शिवसेनेची सर्व यंत्रणा सज्ज आहेच. हजारी यादी त्यांचे प्रमुख, गटप्रमुख यंत्रणाही तयार झालेली असून जाहीर प्रचार सुरू झाला, की तो कशा पद्धतीने करायचा याचेही नियोजन झाले आहे. शहरात कोणत्या मुद्यांवर प्रचार करायचा तेही निश्चित झाले आहे. या शिवाय महायुतीचा संयुक्त जाहीरनामाही तयार होणार आहे. प्रचार सभांचेही प्राथमिक नियोजन झाले असून महायुतीचे नेते जागा आणि उमेदवार याबाबत जो आदेश देतील त्यानुसार पुण्यातील आठही जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, यासाठी सर्व शिवसैनिक प्रयत्न करतील. विजयाचा विश्वास आम्हाला आहे. एकदोन दिवसांत शहरात महायुतीची बैठक होईल आणि सर्व यंत्रणा काम सुरू करेल.
बाळा शेडगे (शहरप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
मनसे पुण्यातील आठही विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढविणार आहे. त्या दृष्टीने शहर कार्यालयामध्ये मतदार यादीनुसार अभ्यास केला जात असून बूथ पातळीवर त्याच भागातील कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविली जाणार आहे. मतदार यादीनुसार ८० टक्के भागांचे काम पूर्ण झाले आहे. पक्षाच्या माध्यमातून सुमारे ८ ते १० हजार नवमतदार जोडले गेले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये सोशल मीडिया हा महत्त्वाचा घटक ठरला. हे ध्यानात घेऊन फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर या माध्यमातून सर्व उमेदवारांच्या कार्यालयाची यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. महिला उपाध्यक्षा रिटा गुप्ता शनिवारी (१३ सप्टेंबर) तर, पुण्याची जबाबदारी असलेले नेते राजन शिरोडकर हे मंगळवारी (१६ सप्टेंबर) पुण्यात बैठका घेणार आहेत.
पुण्यातील विद्यमान आमदार
कसबा- गिरीश बापट (भाजप)
शिवाजीनगर- विनायक निम्हण (काँग्रेस)
कोथरूड- चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)
पर्वती- माधुरी मिसाळ (भाजप)
कॅन्टोन्मेंट- रमेश बागवे (काँग्रेस)
वडगावेशेरी- बापू पठारे (राष्ट्रवादी)
हडपसर- महादेव बाबर (शिवसेना)
खडकवासला- भीमराव तापकीर (भाजप)