सोशल मीडियाद्वारे लोकसभा निवडणुकीत झालेला प्रचार आणि त्या जोरावर मोदी सरकारने मिळवलेल्या यशामुळे येत्या विधानसभेतही या प्रचाराचा जोर राहणार असून सर्व राजकीय पक्ष या माध्यमावर भर देणार आहेत. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्ष व पुण्यातील विधानसभा इच्छुकांनी वॉट्स अॅप, फेसबुक, यू-टय़ूबचा आधार घेतला असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रचारासाठी स्वतंत्र ‘टायटल साँग’ तयार केली आहेत. लवकरच मनसेचेही टायटल साँग सोशल मीडियात दाखल होणार आहे आणि यातील अनेक गोष्टी पुण्यात तयार होत आहेत.
विधानसभा निवडणुका घोषित झाल्यामुळे निवडणुकांची धूम लवकरच सुरू होईल. पुणेही त्याला अपवाद नाही. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण मोठे असल्याने सर्व राजकीय पक्ष व उमेदवार सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्यावर भर देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने त्यांची स्वतंत्र ‘टायटल साँग’ प्रचारासाठी आणली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी टायटल साँगमध्ये तुळजा भवानी, छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. तसेच पक्षातील ज्येष्ठ व प्रभावशाली नेत्यांच्या भाषणांच्या चित्रफिती, पक्षाने काढलेले मोर्चे, केलेली आंदोलने यांच्याही क्लिप वापरून ही गाणी अधिक आकर्षक करण्यात आली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही प्रचाराच्या काळात टायटल साँग येणार आहे. ही टायटल साँग तीन ते चार मिनिटांची आहेत.
पुण्यात राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाच्या प्रचारासाठी ई-कार्यकर्ता मेळावा तसेच सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांना पक्षावर, पक्षाच्या नेत्यांवर व मंत्र्यांवर आरोप वा टीका झाल्यानंतर लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुण्यातील रवी घाटे यांनी वॉट्स अॅपद्वारे उमेदवाराची पूर्ण माहिती, प्रचाराची ठिकाणे, काही व्हीडीओ, अॅडियो, छायाचित्रे आदी मजकूर व दृष्य एकाच वेळी अनेकांना पाठवू शकणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. सध्या लोकप्रतिनिधी प्रचारासाठी या सॉफ्टवेअरचा मोठय़ा प्रमाणात वापर करत आहेत. सोशल मीडियामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. मात्र, यामुळे काही पारंपरिक प्रचाराला खिळ बसली आहे.
—-
पक्षाचे नेते, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे वॉट्स अॅप, यू-टय़ूब, फेसबुकवर स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे. तसेच यू-टय़ूबवर पक्षाच्या विकास कामांची माहिती देण्यात येत आहे. ई-कार्यकर्त्यांचे राज्यभर मेळावे घेतले जात असून पक्षाच्या कामाची माहिती सोशल मीडियातून पोहचवण्याची जबादारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
– रविकांत वरपे
राष्ट्रवादी आयटी व मीडिया सेल प्रमुख

प्रथम टप्यात महाराष्ट्रासमोरील मुख्य प्रश्न आणि सत्ताधारी काँग्रेस व शिवसेना, भाजप यांची त्यासंबंधीची निष्क्रियता याची माहिती दिली जाणार आहे. मनसेने तयार केलेल्या ‘ब्लू पिंट्र’ चा मुख्यत: प्रचारात भर राहणार असून त्यासाठी मोबाईल अॅप व संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. सत्तेत आल्यास या प्रश्नांची सोडवणूक कशी केली जाईल याचीही माहिती देण्यात येणार आहे. मोबाईल अॅप, वॉट्स अॅप, फेसबुक, यू-टय़ूब, ट्विटर या माध्यमातून प्रचाराबरोबच पक्षाची भूमिका मांडण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. पक्षाचे टायटल साँग येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाचे नियम पाळले जातात का, यावरही ई-कार्यकर्ते लक्ष ठेवणार आहेत.    
– अजय भारदे, पुणे
माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सोशल मीडियातील प्रचारावर आदित्य ठाकरे भर देत आहेत. पक्षाचे स्वतंत्र पेज असून त्यात पूर्ण माहिती दिली जाते. राज्यातील विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते सोशल मीडियावर उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांची भाषणे तसेच पक्षाची धोरणे, भूमिका आदींची माहिती देत आहेत. त्यासाठी राज्यात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सोशल मीडियाच्या प्रचारावर भर देण्यास सांगण्यात आले आहे.
– डॉ. नीलम गोऱ्हे
प्रवक्त्या, शिवसेना

लवकरच पक्षाचे ‘टायटल साँग’ येणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सोशल मीडिया सेलमधील शंभर कार्यकर्ते काम करत असून त्यांच्याद्वारे आम्ही मतदारांच्या थेट संपर्कात आहोत. सोशल मीडियावर मालिका सुरू करण्यात आली आहे. त्यात ‘भाऊचा धक्का’, ‘आघाडीचा ‘घो’टाळा’ व्यंगचित्रे आदींचा समावेश आहे.
– जितेन गाजरिया
भाजप सोशल मीडिया सेल, संयोजक
 शिवसेनेचे ‘टायटल साँग’
य भवानी जय शिवाजी..
तेजाचा वारसा आम्हाला
त्याच बळावर वाट..
हिंदुहृदयसम्राट पाठीशी
उद्धवजींची कणखर साथ..
राष्ट्रवादीचे ‘टायटल साँग’
हो देश हा शिवरायांचा
ज्योती, शाहू भीमरावांचा..
पुण्यश्लोक अहिल्येचा
चाँद बेबी, सावित्रीचा..
सळसळत्या रक्तांचा अन् महिलांचा..
– वॉट्स अॅप, फेसबुक, यू-टय़ूबवर राजकीय पक्षांची ‘टायटल साँग’
– वीरपुरुषांच्या गाथा आणि छायाचित्रांचा वापर
– भ्रष्टाचार आणि नेत्यांवर टीका करणारी गाणीही वॉट्स अॅपवर