News Flash

खायला आधी, कामाला कधी कधी! – कार्यकर्त्यांपेक्षा भोजनभाऊंची जास्त गर्दी

खायला आधी आणि कामाला कधी कधी अशी मानसिकता कार्यकर्ते दाखवित असल्याने उमेदवारांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.

| October 14, 2014 03:20 am

निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खानपानाची सुविधा करण्यामध्ये उमेदवार घायकुतीला आले आहेत. खायला आधी आणि कामाला कधी कधी अशी मानसिकता कार्यकर्ते दाखवित असल्याने उमेदवारांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. प्रत्यक्ष प्रचारामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा भोजनभाऊंची गर्दी वाढत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. दिवाळीला अजून आठवडा बाकी असला तरी कार्यकर्त्यांची मात्र गांधी जयंतीपासूनच दिवाळी सुरू झाली आहे.
साहित्य संमेलन नव्हे ही तर भोजनभाऊंची गर्दी आहे, अशी टीका साहित्य संमेलनावर सातत्याने केली जाते. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना एकीकडे मतदार आणि दुसरीकडे कार्यकर्ते अशा दोन्ही घटकांची मर्जी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे ‘होऊ दे खर्च’ असे म्हणत साऱ्यांना सांभाळण्यामध्ये उमेदवारांची शक्ती आणि मोठी रक्कम खर्ची पडत आहे. त्यातूनही खर्चामध्ये काहीशी कपात करण्याच्या उद्देशातून काही उमेदवारांनी केटररकडे आगाऊ नोंदणी केली आहे. तर, काहींनी बचत गटातील महिलांकडे ही खानपानाची जबाबदारी सोपविली आहे. काही उमेदवारांनी आपल्या कार्यालयाजवळच भटारखाना सुरू केला आहे.
पूर्वी ‘घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजायच्या’ असा शब्दप्रयोग रूढ होता. शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते घरातून आणलेला डबा आणून प्रचारादरम्यान एकत्र भोजन करायचे. ते दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. आता परिस्थितीमध्ये बदल घडला असून या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही दोन्ही वेळचे जेवण द्यावे लागत आहे. माणसालाजिंकण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो याची प्रचिती उमेदवारांना दररोज येत आहे. दुपारच्या भोजनामध्ये ही संख्या मर्यादित असली तरी रात्रीच्या भोजनामध्ये ही संख्या किमान दसपटीने वाढते. प्रचारामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी दुपारचे भोजन शाकाहारी असते. त्यामध्ये एखाद्या स्वीट डिशचा किंवा फलाहाराचा समावेश केला जातो. तर, रात्रीच्या भोजनामध्ये मटण किंवा चिकन बिर्याणीची फर्माईश पूर्ण केली जाते. प्रचारामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांचा उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ आणि कार्यकर्त्यांची संख्या याची पूर्वकल्पना दिली जाते. प्रचारादरम्यान एका ठराविक अंतरावर कार्यकर्त्यांना चहापान देऊन ताजेतवाने केले जात होते. तर, दुपारच्या भोजनाआधी कडक उन्हाची बाधा होऊ नये म्हणून ताक किंवा लस्सी याचीही व्यवस्था केली गेली. त्याची चोख व्यवस्था त्या भागातील कार्यकर्त्यांकडून केली जाते, अशी माहिती एका उमेदवाराने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 3:20 am

Web Title: election party workers lunch dinner
टॅग : Election
Next Stories
1 प्रचार संपताच उमेदवारांकडील उधारीच्या वसुलीची लगबग!
2 पैसे वाटपाच्या बोगस फोन कॉल्समुळे पोलीस यंत्रणा हैराण!
3 लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियांना विम्याचे संरक्षण मिळणे अवघडच
Just Now!
X