चिंचवड, पिंपरी व भोसरी हे तीन वेगवेगळे मतदारसंघ असले तरी तेथील प्रश्न जवळपास सारखेच आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकराची जाचक आकारणी, वर्षांनुवर्षे न सुटलेला रेडझोनचा प्रश्न, समाविष्ट गावांमधील नागरी सुविधांचा प्रश्न, एलबीटीला व्यापाऱ्यांचा विरोध, बीआरटी मार्गामुळे निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी, शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न, झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन, कत्तलखान्याला विरोध, वाढती गुन्हेगारी, कंपन्यांचे स्थलांतर यासारखे अनेक मुद्दे सामाईक आहेत. प्रस्थापित तीनही आमदारांच्या विरोधातील नाराजी, बेस्ट सिटी ठरलेल्या श्रीमंत महापालिकेचा भ्रष्ट कारभार, काँग्रेस- राष्ट्रवादीतील संघर्ष, भाजप-शिवसेनेतील गटबाजी व परस्परांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण हे कळीचे मुद्दे आहेत.
पिंपरी
विद्यमान आमदार- अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
युतीच्या जागावाटपात- ही जागा भाजपकडे
नागरिकांचे प्रश्न कोणते?
एमआयडीसी व खासगी झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन, प्राधिकरणातील वाढीव बांधकामांचे नियमितीकरण व हस्तांतर, झोपडय़ांमध्ये शौचालयांचा अभाव, दापोडी ते निगडी दरम्यानच्या बीआरटी मार्गामुळे निर्माण होणारे प्रश्न, साडेबारा टक्के परतावा, डेअरी फार्मचा उड्डाणपूल, पिंपरी बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, खराळवाडी येथे होणारा कत्तलखाना, सिंधी नागरिकांची सनद, बोपखेल येथील रहिवाशांना लष्करी जाच.
कळीचा मुद्दा
गेल्या वेळी तीव्र विरोध असतानाही अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. स्वकीयांकडून ‘पाडापाडी’चा प्रयत्न होऊनही ते निवडून आले. मात्र, पाच वर्षांत पक्षांतर्गत विरोध कमी न होता वाढतच गेल्याचे दिसते. बनसोडे नको, असा सूर राष्ट्रवादीतच आहे. मात्र, त्यांना सक्षम पर्याय नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. विरोधकांमध्ये एकजूट नाही. काँग्रेसचे गौतम चाबुकस्वार चांगली लढत देऊ शकतात. मात्र, जागावाटपात मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे.
चिंचवड
विद्यमान आमदार – लक्ष्मण जगताप (अपक्ष, संलग्न राष्ट्रवादी)
युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे
नागरिकांचे प्रश्न कोणते?
महापालिका तसेच प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करणे आणि शास्तीकराची आकारणी हा येथील
महत्त्वाचा प्रश्न आहे. याशिवाय, रेडझोन, पूररेषा, शेतकऱ्यांचा परतावा, समाविष्ट गावांच्या समस्या, तालेरा रुग्णालय, चापेकरांचे स्मारक यासारखे रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प.
कळीचा मुद्दा
अनधिकृत बांधकामे नियमित न केल्यास तसेच शास्तीकर रद्द न केल्यास राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारणार नाही, असा पवित्रा लक्ष्मण जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत घेतला, त्यावरून राष्ट्रवादीला नकार देत त्यांनी शेकापशी घरोबा केला. मात्र, अजूनही ते प्रश्न कायम आहेत. मात्र, महापौरांसह अनेक जगताप समर्थक नगरसेवक जगतापांना राष्ट्रवादीच्याच उमेदवारीसाठी गळ घालत आहेत व अजितदादाही आग्रही आहेत. दुसरीकडे, विजयाची खात्री वाटू लागल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंडळींची रीघ मातोश्रीवर लागली आहे, त्यामुळे मूळचा शिवसैनिक अस्वस्थ आहे.
भोसरी
विद्यमान आमदार- विलास लांडे (अपक्ष, संलग्न राष्ट्रवादी)
युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे
नागरिकांचे प्रश्न कोणते?
भोसरी व लगतच्या गावांमधील रेडझोनची समस्या वर्षांनुवर्षे कायम आहे, त्यामुळे हजारो नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. याशिवाय, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकर, समाविष्ट गावांमधील अपुऱ्या सुविधा, यमुनानगरची वाढीव बांधकामे, वाढती गुन्हेगारी, वाहतुकीची कोंडी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
कळीचा मुद्दा
भोसरीत पक्षनिष्ठ नव्हे तर व्यक्तिनिष्ठ राजकारण चालते. गावकी-भावकी तसेच पै-पाहुण्यांमधील वर्चस्वाचा वाद हा भोसरीतील कळीचा मुद्दा आहे. मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे विलास लांडे यांच्यासमोर भाचेजावई महेश लांडगे यांचे आव्हान आहे. लांडगे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. शहरप्रमुख विजय फुगे यांच्यासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लांडगे यांची तळी उचलली, त्यामुळे पाच वर्षांपासून तयारीत असलेल्या शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माळी व मराठा समाजात सुप्त वाद आहेत. माळी समाजाचे एकगठ्ठा मतदान भोसरीत निर्णायक ठरू शकते.