दळणवळणासाठी मेट्रोचे स्वप्न पाहणाऱ्या पुण्यामध्ये रेल्वे इंजिन धावणार, कमळ फुलणार, घडय़ाळ बांधलेला पंजा हात दाखविणार की कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पुणेकर हाती झाडू घेणार या प्रश्नाचे उत्तर दीड महिन्याने मिळणार आहे. पण, लोकसभा निवडणुकीत मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचविण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे.
पुण्यात लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यामध्ये पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजे २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. लोकसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आला आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे आता उर्वरित १५ दिवसांत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविणे हे कठीण काम यशस्वीपणे करू शकेल त्याच्या गळ्यात यशाची माळा पडेल.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे विश्वजित कदम (पंजा), भाजप-शिवसेना महायुतीचे अनिल शिरोळे (कमळ), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पायगुडे (रेल्वे इंजिन) आणि आम आदमी पक्षाचे सुभाष वारे (झाडू) यांच्यासह २९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बहुजन समाज पक्षाचे इम्तियाज पिरजादे (हत्ती), पीपल्स गार्डीयन पार्टीचे अरुण भाटिया (पतंग), किशोर ऊर्फ नाना क्षीरसागर (कपबशी), बहुजन मुक्ती पार्टीचे कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील (खाट), समाजवादी पक्षाचे सय्यद अफसर (सायकल), भारतीय नवजवान सेनेचे संजय पडवळ (डिश अँटेना), हे नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार आहेत. याखेरीज आझम मणियार (कपाट), अजय पैठणकर (गॅस सिलेंडर), अशपाक शेख (दूरदर्शन), उमेश मसणखांब (दूरध्वनी), सिमकुमार खिरीड (हंडी), कर्नल (निवृत्त) जयंत चितळे (काचेचा पेला), दिनेश पवार (किटली), नीलेश धनवे (हॅट), छाया बनसोडे (प्रेशर कुकर), बिभीषण देवकुळे (कॅमेरा), मंचक कराळे (शिवणयंत्र), गंगाधर यादव (मेणबत्ती), राहुल डंबाळे (नारळ), रुपाली तांबोळी (लेडी पर्स), विजय सरोदे (स्टूल), शशिकांत ओव्हाळ (बॅट), शिवाजी आढाव (ऑटो रिक्षा), सुषमा गायकवाड (अंगठी), सोमनाथ पवार (शिट्टी) असे अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये ५० टक्के महिला आरक्षणाचे धोरण राबविण्यात आले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून केवळ १० टक्के महिला उमेदवार रिंगणात आहेत. या तीनही उमेदवार अपक्ष आहेत.