News Flash

आवाज.. पुणेकर मतदारांचा!

युती आणि आघाडी तुटली. त्याचबरोबर सर्वच पक्षांनी मोठय़ा संख्येने उमेदवार आयात केले. प्रचाराची पातळीसुद्धा खाली उतरली. त्याचा मतदानावर बरा-वाईट परिणाम झाला का...

| October 16, 2014 03:30 am

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात झालेल्या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर या वेळी मतदान किती होणार, मतदारांमध्ये उत्साह असणार का, याबाबत उत्सुकता होती. युती आणि आघाडी तुटली. त्याचबरोबर सर्वच पक्षांनी मोठय़ा संख्येने उमेदवार आयात केले. प्रचाराची पातळीसुद्धा खाली उतरली. त्याचा मतदानावर बरा-वाईट परिणाम झाला का हे जाणून घेण्यासाठी विविध घटकांतील मतदारांशी चर्चा केली.. त्यातून अनेक गोष्टींवर प्रकाश पडला.
१) तरुण मतदार म्हणतात..

उमेदवारांबद्दल नाराजी असूनही..
तरीही आमचे देशासाठी मतदान!
‘‘मी या वेळी पहिल्यांदाच मतदान केले. विकासासाठी मतदान करायला पाहिजे. महाराष्ट्र आणि देश विकसित झाला पाहिजे. त्यामुळे मी मतदान केले आहे. लोकांमध्ये उमेदवारांबद्दल नाराजी आहे. पण मतदान हे प्रत्येकानेच केलेच पाहिजे.’’
– मुकेश ठाकूर, खडकी
———
‘‘लोकसभेला मतदार यादीत नाव सापडले नव्हते. या वेळी नाव सापडले. पक्ष चांगले असतील किंवा वाईट, त्यांना जागा दाखवून देण्यासाठी मतदान हाच एक पर्याय आहे.’’
– निकिता कुलकर्णी, आनंदनगर (सिंहगड रस्ता)
———-
मत देणे हा हक्कच
मतदान करणे हा घटनेने मला दिलेला हक्क आहे. तो बजावणे हे माझे कर्तव्य मी केले आहे. निवडणुकीपूर्वी दररोज माझ्यावर जाहिरातींचा मारा केला गेला. या जाहिरातींमधील फोलपणा माझ्या ध्यानात आला. काही जाहिरातींमधून भावना भडकविण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्याचा मला त्रास होत होता. त्याविरोधात मत देणे हेच माझ्या हातामध्ये उरले होते. त्यामुळे मी प्रामाणिकपणे मतदान केले.
– अधीश पायगुडे, युवा रंगकर्मी (महर्षिनगर)
…………..
योग्य व्यक्तीलाच मतदान
मतदान हा देशाच्या घटनेने दिलेला अधिकार मी बजावला. यंदाच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करावे हा प्रश्न पडला होता. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटली. सगळे पक्ष वेगळे झाल्यामुळे उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. वैयक्तिक संपर्काला महत्त्व आले आहे. त्यामुळेच मतदारसंघाचा विकास करू शकेल असा पक्ष आणि योग्य व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मतदान केले.
– नेहा देडगावकर, कसबा पेठ
………
‘‘आपले प्रश्न सोडवायचे असतील तर मतदान हाच एक पर्याय आहे. मी लोकसभेसाठी मतदान केले होते, आतासुद्धा करत आहे.’’
– रूपाली सोनावणे, पर्वती पायथा
———-
‘‘भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. तो मी प्रामाणिकपणे बजावला. भविष्यामध्ये जे सरकार सत्तेवर येईल त्या सरकारने सामान्य माणसाच्या हिताकडे लक्ष द्यावे एवढी अपेक्षा ठेवून मतदान केले. आपल्या एका मतामुळे फरक पडू शकतो याची जाणीव असल्याने स्थिर सरकार मिळावे या उद्देशातून मतदान केले आहे.’’
– दिनेश सप्तर्षी, रविवार पेठ (तरुण व्यावसायिक)
————-

२) महिला मतदार म्हणतात..
कोणीतरी चांगले निवडून यावे
यासाठीच आम्ही हक्क बजावला!
‘‘मतदान हा मानवी जीवनाचा हक्क आहे. समाजाला घडवणाऱ्या व्यक्तीसाठी हा हक्क वापरला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. त्यामुळे काम करणाऱ्या व्यक्तीसाठी मतदान केलेच पाहिजे. ’’
कु. भाग्यश्री, औंध रस्ता
———–
दोन्ही कर्तव्य पार पाडली
‘‘सदाशिव पेठेतील झाशीची राणी प्रशालेत दुपारी मी मतदान केले. जेव्हापासून मतदानाचा हक्क मिळाला आहे, तेव्हापासून आजपर्यंत मी एकदाही मतदान चुकवलेले नाही. मतदानामुळे कंपनीला सुटी होती; पण काही कामे आजच पूर्ण करणे आवश्यक होते. ती पूर्ण केली आणि दुपारी मतदानासाठी गेले. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. मतदान हे नागरिकाचे कर्तव्य म्हणून आणि काम पूर्ण करणे हे स्वत:चे कर्तव्य म्हणून.’’
– धनश्री फाटक, लेखापाल, सदाशिव पेठ
————-
चांगले कोणीतरी निवडून यावे..
‘‘ सध्या मी तात्पुरती वडगावला राहायला गेले आहे; पण मतदानासाठी मुद्दाम आज दुपारी पुण्यात आले. मतदान हा आपला हक्क आहे हे मी मानते. त्यामुळे अनेक वर्षे मी मतदान करते आहे. कोणीतरी चांगले निवडून यावे असे नेहमी वाटते. त्यासाठी मी मतदान करते.’’
– पद्मा फडके, उद्योजिका
—-
योग्य उमेदवारासाठी मतदान
‘‘मतदान हा देशाच्या घटनेने सामान्य माणसाला दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे. तो बजावलाच पाहिजे या भावनेतून मतदान केले. विधानसभेची निवडणूक असल्याने आपल्या परिसराचा विकास करू शकेल अशा उमेदवाराला मतदान केले. निवडणुकीआधी प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाचा जो गदारोळ उडाला होता ते ध्यानात घेता ‘नोटा’ वापरावा असे मनात होते. पण, जात-पात न पाहता मतदारसंघाच्या विकासाची दृष्टी असलेला योग्य उमेदवार पाहूनच मतदान केले.’’
– गंधाली शहा, बुधवार पेठ
———
‘‘मतदान कर्तव्य म्हणून केलं आणि ते प्रत्येकाने केलेच पाहिजे. लोकांनी पुढे येऊन मतदान करण्याला पर्याय असू शकत नाही. राजकीय पक्षांचे गोंधळ सुरू असले तरीही मतदान केलेच पाहिजे.’’
– आरती पाटील, कात्रज
———
‘‘मतदान करणे गरजेचे आहे. ते कर्तव्य आहे त्यामुळे मतदान केले. उमेदवारांच्या किंवा पक्षाच्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत, पण तरीही मतदान करणे आवश्यक आहे. मतदानच केले नाही, तर व्यवस्थेबाबत बोलण्याचा हक्क नाही.’’
– अनिता कात्रे, पद्मावती
————–

३) मध्यमवर्गीय-उच्चभ्रू मतदार म्हणतात..

आमचे मतदान..
एक जबाबदारी पार पाडण्यासाठी
लोकांपर्यंत पोहोचून काम करण्यासाठी मतदान आवश्यक आहे. त्यामुळेच मी मतदान केले. काहींचा उमेदवारावर व्यक्तिगत राग असतो. त्यामुळे ते मतदान करत नाहीत. पण राग व्यक्त करण्यासाठीच ही मोठी संधी असते.
– अतिश सिंग, शिवाजीनगर
———–
‘‘आपल्याला चांगला लोकप्रतिनिधी मिळावा असे वाटत असेल, तर मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. ही एक जबाबदारी आहे. त्यामुळे मी मतदान केले. सध्याच्या राजकारणाबद्दल नाराजी असली, तरी आपले मत वाया जाणार नाही. याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे.’’
प्रियंका बराथे (मराठी कलाकर), मुळानगर
———–
‘‘मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीची कामे करणारच पण त्यापूर्वी मतदान केले. ते केलेच पाहिजे.’’
– सविता वैद्य (पद्मावती)
——–
इंग्लंडहून मतदानासाठी आठवडाभर आधी
‘‘माझा मुलगा राहुल आणि सून राधिका हे दोघेही नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये होते. ते दिवाळीत पुण्यात येणार होते; पण मतदान १५ ऑक्टोबरला आहे, तर आठवडाभर आधी ये असे मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनीही मतदानाला प्राधान्य दिले. विमानाची तिकिटे रद्द केली. मतदानाच्या दिवशी पोहोचता येईल अशी तिकिटे काढली. त्यासाठी त्यांचे शंभर पौंड जास्त खर्च झाले. इंग्लंडहून दोघेही मंगळवारी मध्यरात्री मुंबईत पोहोचले. मी त्यांना आणायला गेलो होतो. मुंबईतून निघून सकाळी साडेसात वाजता आम्ही थेट बॅगा वगैरेसह कोथरूडमधील परांजपे नर्सरी स्कूल येथे मतदान केंद्रावर पोहोचलो. त्या वेळीही केंद्रावर गर्दी होती. ओळखीचा पुरावा म्हणून दोघांचेही पासपोर्ट होतेच. त्यामुळे काही अडचण आली नाही. मतदान करून मग घरी पोहोचलो.’’
– प्रकाश पानसे, निवृत्त बँक अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 3:30 am

Web Title: election reaction people
टॅग : Election
Next Stories
1 पुण्यातील मतदानात लक्षणीय वाढ
2 विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचे मतदान व त्यांच्या प्रतिक्रिया
3 तिचा हट्ट पुरविण्यासाठी!
Just Now!
X