‘‘आमचे नाव शिवाजीनगर मतदारसंघात आहे.कलमाडी हायस्कूलमध्ये आमचे मतदान होते. मी ९७ वर्षांचा असून माझी पत्नी कुसुम ९४ वर्षांची आहे. पण वयाचा बाऊ न करता जो आपला अधिकार आहे, तो आपण बजावलाच पाहिजे, या विचाराने आम्ही दोघांनी मतदान केले. प्रत्येकानेच मतदान केले पाहिजे, या भूमिकेतून मी पत्नीलाही घेऊन जाऊन मतदान केले. माझ्यासारखे अनेक ज्येष्ठ नागरिक तेथे उत्साहात मतदान करत होते. ज्यांची चालण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सोय केल्यामुळे अनेकांची सोय झाली. मलाही हा अधिकार बजावल्यामुळे छान वाटत आहे.’’
– मधुकर मेहेंदळे, संस्कृत पंडित
 
पहिल्या मतदानाचा आनंद
यापूर्वी दोन-तीनदा नाव नोंदवूनही मतदार यादीत नाव येत नव्हते. त्यामुळे मतदान करता आले नाही; पण यावेळी नाव यादीत आल्यामुळे मतदान करता आले. मी कोथरूडमध्ये मतदान केले. बरोबर आधार कार्डही नेले होते. पहिल्यांदाच मतदान करत असल्यामुळे मला त्याचा विशेष आनंद होत होता.
– युवराज सुपेकर, रिक्षाचालक
———
कर्वेनगरमध्ये माझे मतदान केंद्र होते. त्याआधी मी दिवसभर भोसरीत कामासाठी गेलो होतो; पण मतदानाला यायचेच हे ठरवले होते. तेथून दुपारी तीन वाजता निघून मतदान केंद्रावर पोहोचलो. केंद्रावर गर्दी आणि मतदानासाठी रांगाही होत्या. तरीही वेळेत मतदान झाले याचा खूप आनंद झाला.
हर्षल गोरे, अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी