दोन्ही मतदार संघांत पुण्यातील सर्वाधिक मतदार

पुणे : पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात अनुक्रमे चार लाख २६ हजार २५७ आणि ७२ हजार ५४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोन्ही मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात असल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांचा निकाल पुणेकरांच्या हाती असणार आहे. पदवीधरचे पुण्यातील मतदार एक लाख ३६ हजार ६११, तर शिक्षकचे पुण्यातील मतदार ३२ हजार २०१ एवढे आहेत.

पदवीधर मतदार संघात मतदारांची संख्या चार लाख २६ हजार २५७ झाली आहे. या मतदार संघात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यातयात एक लाख ३६ हजार ६११ झाले आहेत. तर, शिक्षक मतदार संघातही सर्वाधिक ३२ हजार २०१ मतदार पुणे जिल्ह्यात झाले आहेत. दोन्ही मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात असल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांचा निकाल पुणेकरांच्या हाती असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पदवीधरसाठी भाजपचे संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे शरद पाटील हे तिन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागणी होणार असल्याने पुणे, कोल्हापूर येथील मतांवर उमेदवारांना लक्ष के ंद्रित करावे लागणार आहे.

शिक्षक मतदार संघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार हे सोलापूरमधील आहेत. काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर हे कोल्हापूरचे आहेत. मनसेचे विद्याधर मानकर आणि अपक्ष उमेदवार संतोष फाजगे हे पुण्यामधील उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांची भिस्त पुण्यावर अवलंबून असणार आहे. पुण्यातील सर्वाधिक मते घेणारा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने या मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य पुणे ठरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पदवीधर मतदार संघ जिल्हानिहाय मतदार

पुणे – एक लाख ३६ हजार ६११, कोल्हापूर – ८९ हजार ५२९, सांगली – ८७ हजार २३३, सातारा – ५९ हजार ७१ आणि सोलापूर – ५३ हजार ८१३ एकू ण मतदार चार लाख २६ हजार २५७

शिक्षक मतदार संघ जिल्हानिहाय मतदार

पुणे – ३२ हजार २०१, सोलापूर – १३ हजार ५८४, कोल्हापूर – १२ हजार २३७, सातारा – सात हजार ७११ आणि सांगली सहा हजार ८१२ एकू ण मतदार ७२ हजार ५४५