लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच मतदान करणाऱ्या १८ ते २२ वर्षे वयोगटातील तरुणाईच्या मोठय़ा संख्येमुळे बारामती लोकसभा मतदारसंघ युवा ठरला आहे. तर, चाळिशी पार केलेल्या मतदारांच्या सर्वाधिक संख्येमुळे पुणे शहर लोकसभा मतदारसंघ ज्येष्ठ झाला आहे.
बारामती मतदारसंघामध्ये १८ ते २२ वर्षे वयोगटातील नवमतदारांची संख्या १ लाख ३ हजार ४०१ आहे. जिल्हय़ामध्ये मतदारांच्या नोंदणीचा हा उच्चांक आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये नवमतदारांची संख्या ७० हजार ४७ एवढी आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ९९ हजार ४३४ तर, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये १८ ते २२ वर्षे वयोगटातील केवळ ४८ हजार नवमतदार आहेत. लोकसभा निवडणुकीची मतदारयादी जिल्हा प्रशासनाने नुकतीच जाहीर केली असून त्याद्वारे ही बाब स्पष्ट झाली आहे.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये २३ ते ३९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या ७ लाख ३९ हजार ४३७ असून ४० ते ५९ वर्षे वयोगटात या ६ लाख ९० हजार ३७८ मतदार आहेत. ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३ लाख २० हजार ५२ एवढी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात २३ ते ३९ वर्षे वयोगटामध्ये ७ लाख ८६ हजार ८०७ मतदार असून ४० ते ५९ वर्षे या वयोगटामधील मतदारांची संख्या ६ लाख ३१ हजार ५२८ आहे. २ लाख ९७ हजार १३७ मतदार हे ६० वर्षांपुढील आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये िपपरी, चिंचवड आणि मावळ या जिल्हय़ातील तीनच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात २३ ते ३९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या ५ लाख ७ हजार ९९० असून ४० ते ५९ वर्षे वयोगटामध्ये ३ लाख ९६ हजार ३४१ मतदार आहेत. तर, ६० वर्षांपुढील मतदारांची संख्या १ लाख ४१ हजार ८१२ एवढी आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये २३ ते ३९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या १ लाख २४ हजार २७६ असून ४० ते ५९ वर्षे वयोगटामध्ये १ लाख २ हजार ८७७ मतदार आहेत. ५० हजार ६७७ एवढी ज्येष्ठ मतदारांची संख्या आहे.