तळपता सूर्य, हवेतील बाष्प आणि ३८.७ अंशांचे तापमान यामुळे हवेत बऱ्यापैकी उष्मा असूनही पुण्याचे वातावरण संपूर्णपणे निवडणूकमय बनले होते. बहुतांश दुकाने बंद, रस्त्यांवर कमी गर्दी आणि सुटीचा मूड असला तरी मतदान केंद्रांवर मात्र चांगलीच गर्दी होती. उकाडा असूनही दुपारच्या वेळी मतदानकेंद्रांवर रांगा लागल्या होत्या, तर मतदान केल्यास विविध दुकानांमधून दिल्या जाणाऱ्या सवलतींचाही पुणेकरांनी लाभ घेतला. पुणे शहर तसेच जिल्ह्य़ातील प्रमुख उमेदवार, अभिनेते-अभिनेत्री, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती, तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे मतदान केले..
मतदानासाठी दुकानदारांचा ‘बंद’!
लग्नसराईचा हंगाम सुरू असूनही गुरुवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावरील बहुतांश दुकाने बंद होती. विशेष म्हणजे या रस्त्याकडेला वाहन लावायला सहज जागा मिळत होती. त्यामुळे दुकानदारांचा पुन्हा बंद सुरू झाला की काय, असा प्रश्न पडावा असे वातावरण पाहायला मिळाले.
लक्ष्मी रस्त्यावर छोटी दुकाने वगळता जवळजवळ सर्व मोठी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पु.ना. गाडगीळ, तनिष्क, वामन हरी पेठे यांच्यासह इतर सर्व छोटय़ा-मोठय़ा सराफांची दुकाने

मतदान केंद्रांवर गर्दी आणि ओस पडलेले रस्ते असेच काहीसे वातावरण गुरुवारी दुपारी पुण्यातील बहुतांश रस्त्यांवर होते.

बंद होती. काही दुकानांबाहेर ‘मतदानामुळे दुकान पूर्ण दिवस बंद राहणार’ असल्याचे फलकही लावले होते. तसेच जयहिंद, मेन्स अॅव्हेन्यू, वुडलँड, कॉटनकिंग, वामा यांसारखी कपडय़ांची मोठी दुकानेही बंद होती. सेंट्रल, बिग बझार यांसारखे मॉल्सही सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा उघडण्यात आली. ‘सेंट्रल’ दुपारी १२.३० नंतर, तर ‘बिग बझार’ दुपारी २ वाजता उघडण्यात आले.
सुट्टय़ांचे दिवस आणि त्यात मतदानानिमित्त सुटी मिळालेली असली तरी यंदा मतदानाच्या दिवशी बाहेरगावी जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. स्वारगेट एसटी स्थानकावर नेहमीपेक्षा कमी गर्दी असल्याचे तेथील दुकानदारांनी सांगितले. आधी मतदानाचा हक्क बजावून नंतर सुटीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या अनेक पुणेकरांनी दुपारनंतर स्वारगेटची वाट धरली होती. स्वारगेट स्थानकावर भेटलेल्या सुलेखा घाडगे आपल्या कुटुंबासोबत दोन दिवस महाबळेश्वरला चालल्या होत्या, पण मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच. ‘मी आणि माझ्या कुटुंबातील २० जणांनी सकाळीच मतदान केले आणि आता फिरायला महाबळेश्वरला चाललो आहोत,’ असे श्रीमती घाडगे यांनी सांगितले.
पुण्यातील फग्र्युसन, जंगली महाराज, सिंहगड, कर्वे आदी प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी नेहमीपेक्षा कमीच होती. या रस्त्यांवरील दुकानेही काही प्रमाणात बंद होती. मात्र, हॉटेल्स उघडी दिसली, तिथे गर्दीही होती. फग्र्युसन रस्त्यावरील वैशाली, वाडेश्वर याठिकाणी नेहमीप्रमाणे वेटिंगही पाहायला मिळाले. तुळशीबागेतील सर्व दुकाने सुरू होती, मात्र या ठिकाणीही गर्दी कमी दिसली.
‘सवलती’ना प्रतिसाद!
पुण्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध दुकानांनी देऊ केलेल्या सवलतींना गुरुवारी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. ग्राहक पेठकडून घरगुती वस्तूंवर १५ टक्के सवलत देण्यात आली होती. ‘ग्राहक पेठ’च्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, रोजच्या येणाऱ्या ग्राहकांपेक्षा गुरुवारी ग्राहकांची संख्या अधिक होती. बहुतांश लोक मतदान करून आले होते. त्यांनी सवलतींचा फायदा घेतला. ‘इको क्लीन कार्स’ तर्फे मतदारांना मोफत कार वॉश करून देण्याचे जाहीर केले होते. तिथे रोज ५० च्या आसपास गाडय़ांचे वॉश होते. गुरुवारी सकाळपासूनच लोक फोनवरून संपर्क साधून मतदान केल्याचे सांगत होते. दुपापर्यंत ३४ गाडय़ा मोफत धुवून देण्यात आल्या. हा उपक्रम दोन दिवस चालणार आहे, अशी माहिती इको क्लीन कार्सचे श्रीराम टेकाळे यांनी दिली.
‘आप’ची इतर पक्षांना ‘टोपी’!
मतदान केंद्रांजवळ कोणत्याही पक्षाची खूण, चिन्ह, ओळख दाखवणे हा गुन्हा असताना आपच्या कार्यकर्त्यांनी मात्र आपली टोपी घालूनच मतदान केंद्रामध्ये प्रवेश केला. मात्र, टोपी कोरी असल्यामुळे इतर कोणताही पक्ष आपच्या कार्यकर्त्यांवर आक्षेपही घेऊ शकला नाही.
आपची टोपी हीच आपची ओळख बनली आहे. अगदी प्रत्येक मतदान केंद्रावर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अगदी आवर्जून ओळखू येत होते. मतदानासाठी लागलेल्या रांगांमध्ये पांढऱ्या टोप्या घातलेले तरुण आवर्जून दिसत होते. आपची टोपी घालूनच कार्यकर्ते मतदानासाठी जात असल्यामुळे अनेक मतदान केंद्रावर गुरुवारी आपचीच हवा होती. मतदान केंद्राच्या परिसरामध्ये कोणत्याही उमेदवाराचे किंवा पक्षाचे चिन्ह, खूण नेण्यास बंदी असते. पक्षांनी वाटलेल्या स्लिपांवरील पक्षाचे चिन्हही फाडूनच स्लिप आत नेता येते. मात्र, आपचे कार्यकर्ते आपली ओळख असलेली टोपी घालूनच सगळीकडे फिरत होते. काही मतदान केंद्रांवर आपच्या कार्यकर्त्यांच्या टोपीवर आक्षेप घेण्यात आले. मात्र, कार्यकर्त्यांची टोपी ही पूर्णपणे कोरी होती. त्यामुळे त्यावरील आक्षेपांचा विचार करण्यात आला नाही. उन्हासाठी टोपी घातल्याचे सांगत आपच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांना टोपी घातली!
‘मॉर्निग वॉक’ आणि मतदानही!
सकाळी साडेसहा- पावणेसातची वेळ आणि मतदान केंद्रांवर चक्क रांगा..! हे चित्र आहे प्रभात रस्ता, मॉडेल कॉलनी आणि औंधमधील सानेवाडीमधील मतदान केंद्रांचे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या भागातील मतदारांनी ‘मॉर्निग वॉक’ आणि मतदान दोन्ही एकदमच उरकून घेतले. प्रभात रस्त्यावरील विमलाबाई गरवारे प्रशालेत पावणेसातच्या सुमारास, तर मॉडेल कॉलनीमधील विद्याभवन हायस्कूल आणि औंध आयटीआय केंद्रात साडेसहा वाजताच गर्दी होऊ लागली होती. त्यामुळे बूथ कर्मचाऱ्यांनाही मतदानाच्या पूर्वीपासूनच ‘अलर्ट’ रहावे लागत होते. ‘मतदान सात वाजता सुरू होते,’ असे समजावल्यानंतरही नागरिक त्यांना ‘आमचे मत आत्ताच घ्या ना,’ असे आर्जव करत होते. विशेषत: प्रभात रस्ता आणि औंधमध्ये सकाळी लवकर मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक दिसली.
तरूण मतदारांच्या संख्येचा अंदाज जरासा चुकलाच!
– ज्येष्ठांचीच संख्या लक्षणीय
यंदाची निवडणूक नवमतदारांची निवडणूक म्हणून उठून दिसेल असे वर्तवले जात होते. मतदानाला नवमतदार दिसलेही; पण ते ज्या भव्य संख्येने दिसतील असे वाटत होते तो अंदाज मात्र काहीसा चुकला. मतदान करून आल्या- आल्या बोटावरची शाई मोबाईलवर टिपणारे ‘सेल्फीज’ बघायला मिळाले; पण जरा कमीच संख्येने. एरवी मतदानासाठी न उतरणारे नागरिक मात्र आवर्जून मतदानासाठी आल्याचे दिसून आले. विशेषत: मतदानासाठी आलेल्या वयोवृद्घ मंडळींची संख्या लक्षणीय होती. रिक्षा करून फक्त मतदानासाठी भल्या सकाळी आलेले ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने पाहायला मिळाले. फक्त मतदानासाठी रिक्षा करून आलेले, हातातली काठी सावरत हळूहळू मतदान केंद्राच्या पायऱ्या चढणारे, आपल्याबरोबर आलेल्या छोटय़ा नातवाचा आधार घेणारे आजी-आजोबा मोठय़ा संख्येने दिसले.
पोलिंग बूथवर याद्यांसह ‘ई-स्लिप’ही
मतदान केंद्राच्या जवळ उभारलेले मंडप, त्यात याद्या घेऊन बसलेले कार्यकर्ते, याद्यांमधून नावांचा शोध, मतदारांना हाताने स्लीप लिहून देण्याचे काम.. हे पारंपरिक चित्र गुरुवारी अनेक बूथवर दिसत होते आणि त्याबरोबरच अनेक बूथवर ‘ई स्लिप’ दिली जात होती. मतदानाच्या प्रक्रियेत असलेले बूथचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि स्लिप देण्यासाठी राजकीय कार्यकर्ते तेथे दिवसभर बसून असतात आणि तेथूनच सर्व यंत्रणा हलवली जाते. या वेळी त्यात ई स्लिपची भर पडली. मतदाराने नाव सांगताच त्याचे नाव शोधून त्याला स्लिप देण्याचे काम या यंत्रांवर सुरू होते. सहकारनगर, लक्ष्मीनगर भागातील ५७ आणि ६७ या दोन प्रभागांमधील सर्व बूथवर अशा पद्धतीने स्लिप दिली जात होती. मतदाराने नाव सांगितल्यानंतर येणाऱ्या स्लिपवर यादी क्रमांक, मतदाराचा यादीतील अनुक्रमांक, त्याचे मराठी व इंग्रजीतील नाव, वय, मतदान केंद्राचे नाव, खोली क्रमांक ही सर्व माहिती छापील स्वरूपात ई स्लिपवर येत होती. ही स्लिप देण्याचे काम काही सेकंदांमध्ये होत होते आणि मतदार लगेच ही स्लिप घेऊन मतदानासाठी जात होते.
एकाच नावाच्या दोन-दोन व्यक्तींना मिळाला मतदानाचा हक्क!
एकच नाव असलेले दोन मतदार.. दोघांचा पत्ताही एकच.. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र किंवा फोटो व्होटर स्लिप यापैकी एक ओळखीचा पुरावा दोन्ही मतदारांकडे.. मतदानाला आल्यावर आपले मतदान आधीच झाल्याचे समजते तेव्हा आपल्यालाही हा हक्क मिळावा ही दुसऱ्या मतदाराची मागणी पूर्ण करण्यात आली. निवडणूक आयोगाने अशा मतदारांना प्रदत्त मतदानाचा अधिकार प्रदान करून त्यांचे मतदान पारंपरिक मतपत्रिकेद्वारे करून घेतले.
पर्वती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय येथे गुरुवारी एकच नाव असलेले दोन मतदार दत्त म्हणून हजर असल्याच्या तीन घटना घडल्या. या मतदान केंद्रामध्ये शेजारील तीन खोल्यांमध्ये प्रत्येकी एका मतदाराला या अनुभवाला सामोरे जावे लागले. मतदानाला आल्यानंतर आपले मतदान अगोदरच झाले असल्याचे समजल्यावर त्या मतदारानेही आपल्या हक्काची मागणी केली. अखेर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रदत्त मतदानाचा अधिकार बहाल करून त्यांचे मतदान करून घेण्यात आले. पारंपरिक मतपत्रिकेवर शिक्का उमटविलेल्या या मतपत्रिका स्वतंत्रपणे ठेवण्यात आल्या. या मतपत्रिकांची स्वतंत्र मतमोजणी होणार असल्याची माहिती या कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मोहन दत्तात्रेय वैद्य (वय ६५, रा. ज्ञानेश्वरी प्रसाद, सहकारनगर क्रमांक २) हे दुपारी साडेबाराच्या सुमारास मतदानासाठी आले. तुमचे मतदान आधीच झाले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यादीतील भाग क्रमांक आणि अनुक्रमांक हादेखील बरोबर असल्याने आधी आलेल्या मोहन वैद्य यांना मतदान करू देण्यात आले. नंतर आलेल्या वैद्य यांचे प्रदत्त मतदान झाले.
तारामती नामदेव नाईक (वय ७१, रा. लक्ष्मीनगर) यांच्या नावाचे मतदान सकाळी आठ वाजताच झाले होते. आधी आलेल्या तारामती नाईक यांच्या मतदानास काँग्रेस उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतला होता, मात्र यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदार ओळखपत्र या बाबींची तपासणी करूनच त्यांना मतदान करू दिले गेले. मतदानासाठी नंतर आलेल्या तारामती शिंदे यांचे शिक्का मारून मतदान झाले. याच परिसरातील प्रवीण बाबुराव साळुंके यांचे मतदान आधीच झाले होते. सकाळच्या वेळात आलेल्या प्रवीण साळुंके यांनी फोटो व्होटर स्लिप दाखवून मतदान केले, मात्र त्यांनी मतदाराच्या सहीऐवजी अंगठा दिल्याचे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने सांगितले.