पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये आपल्याला नारायण हे व्यक्तिमत्त्व भेटते. एखादे लग्न ठरवण्यापासून त्या लग्नाची वरात मार्गी लागेपर्यंतच्या प्रत्येक प्रसंगात या नारायणाशिवाय कोणाचेही पान हालत नाही. नारायणही घरचेच कार्य असल्यासारखा निरपेक्षपणे या कार्यात राबत असतो. राजकीय क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता वानवा आहे; पण तरीही काही ठिकाणी असे नारायण आजही बघायला मिळतात. निवडणुकीतील अशा ‘नारायणां’ची ही ओळख..

बाबूलाल
पुण्यातील भाजपच्या कार्यालयाची ओळख ‘३४ बुधवार’ अशी आहे. ही ओळख एवढी पक्की आहे, की कार्यकर्तेही कार्यालयात निघालोय असं म्हणण्याऐवजी ‘३४ बुधवारमध्ये निघालोय’, ‘३४ बुधवारला भेटू’ असं सहज म्हणत असतात. कोणतीही निवडणूक आली की ‘३४ बुधवार’ गजबजून जातं. सध्याचीही परिस्थिती तशीच. प्रचार पत्रकांचे गठ्ठेच्या गठ्ठे सर्वत्र रचलेले.. एका कोपऱ्यात कोणत्यातरी मतदारसंघातील कार्यकर्ते एकत्र आलेले.. वरच्या मजल्यावर केंद्रीय मंत्र्याच्या उपस्थितीत काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक.. फोन आणि मोबाइलचा अखंड आवाज.. अशा धावपळीत एकाच व्यक्तीला हाका येत असतात.. कोणी विचार असतं, बाबूलाल एसीचा रिमोट कुठायं, कोणाची विचारणा चहाचं काय झालं.. एवढय़ात पलीकडून आवाज येतो, तीन-चार कॉफी पण सांगा, आणखी एक आदेश सुटतो, आजचे सगळे पेपर हवे आहेत.. आदेशावर आदेश येतच असतात.. आणि त्या प्रत्येक आदेशाची पूर्तता बाबूलाल मनोभावे करत राहतात.
पक्ष कार्यालयाचा भार एकहाती पेलणारं हे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबूलाल भिला शिरोडे. भाजपमधील त्यांची ओळख बाबूलाल अशी. रोज दुपारी बारा ते रात्री नऊ-दहापर्यंत ते पक्ष कार्यालयात काम करत असतात. निवडणुका आल्या, की मग सकाळी कार्यालयात येण्याची वेळ अलीकडे येते आणि रात्री घरी जाण्याची वेळ आणखी पलीकडे जाते. निवडणुकीतील बाबूलालजींची धावपळ आणि कामाची गडबड बघण्यासारखीच असते. महत्त्वाचे निरोप घेणे आणि ते योग्य व्यक्तीला देणे, पत्रकार परिषदा, पक्षाच्या बैठका या दृश्य कामांव्यतिरिक्त विविध परवानग्या आणि इतर अनेक कामे ते बिनबोभाट पार पाडत असतात. या सर्व कामातील विशेष म्हणजे यातील कोणत्याही कामाला ते कधीही हलकं मानत नाहीत. पत्रकार परिषदेसाठी खुच्र्या मांडण्यापासून ते चहा सांगायला जाण्यापर्यंत प्रत्येक काम फक्त बाबूलालजींचंच असतं.
 ‘३४ बुधवार’चं पान बाबूलालजींशिवाय हलत नाही हेच खरं. आणीबाणीनंतर म्हणजे १९७७ मध्ये ते जनता पक्षाच्या कामात आले आणि पुढे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते झाले. कार्यकर्त्यांशी संपर्क हे त्यांच्या कामाचं मुख्य सूत्र. पक्षाचं काम करत असताना पत्नी आणि तीन मुलगे यांचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी काही नोकऱ्याही केल्या. पण त्याहीपेक्षा तळमळ होती ती भाजपच्या कामाचीच. त्यामुळे १९९५ पासून त्यांच्याकडे कार्यालयमंत्री ही जबाबदारी आली. पक्षातील सर्व गटा-तटांचा, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा कमालीचा विश्वास संपादन केल्यामुळे गेली एकोणीस वर्ष बाबूलाल ही जबाबदारी यशस्वी रीत्या सांभाळत आहेत. या एकोणीस वर्षांत त्यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दलही कोणी कणाचाही आक्षेप घेतलेला नाही. इतका हा सचोटीचा माणूस आहे.
 कार्यालयमंत्री हे पद बाबूलालजींकडे असलं, तरी जे पडेल ते काम करणारा मी कार्यकर्ता आहे असं ते अभिमानानं सांगतात. त्यांचे तिन्ही मुलगे उच्चशिक्षित आहेत. एक चार्टर्ड अकौन्टन्ट आहे, दुसरा कंपनी सेक्रेटरी आणि तिसरा प्राध्यापक. बाबूलाल म्हणतात, ‘स्वीकारलेलं काम मी प्रामाणिकपणे करत राहिलो, त्यामुळे कुटुंबात मला हे शाश्वत सुख मिळालं. अनेक मंत्री, पक्षाचे नेते, खासदार, आमदार मला जवळचा मित्र मानतात. अजून काय पाहिजे आपल्याला?’
राजकारणात निरपेक्ष वृत्ती आणि विश्वास या दुरापास्त झालेल्या गोष्टी बघायच्या असतील, तर बाबूलालजींची भेट अपरिहार्यच.