निवडणूक संपली असल्याने आता आपण कोणत्या पॅनेलचे हे विसरून साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची म्हणून सर्वानी काम करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी शुक्रवारी व्यक्त केली. वैयक्तिक स्वार्थ आणि हितसंबंधांमुळे परिषदेमध्ये साहित्यिक वातावरण राहिले नव्हते. म्हणूनच मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताना लेखक, प्रकाशक यांचा एक अनौपचारिक मेळावाच आयोजित केला होता. त्या वेळी मिरासदार यांनी ही अपेक्षा बोलून दाखवली. ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे, माजी कार्याध्यक्ष डॉ. वि. भा. देशपांडे, साहित्यिक डॉ. न. म. जोशी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कादंबरीकार राजन खान, गजलकार रमण रणदिवे, प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, आश्लेषा महाजन, रागिणी पुंडलिक, ‘जीएं’च्या भगिनी नंदा पैठणकर, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, विश्वास वसेकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, समीक्षक प्रा. सु. प्र. कुलकर्णी, प्रकाशक अनिल कुलकर्णी, नवीन इंदलकर, ‘ग्रहांकित’चे संपादक चंद्रकांत शेवाळे या वेळी उपस्थित होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह नूतन पदाधिकारी या प्रसंगी हजर होते.
वैद्याच्या पुडय़ांचा गुण आला नाही तर रुग्ण डॉक्टरकडे जातोच, अशा शब्दांत रामदास फुटाणे यांनी परिषदेच्या सत्तांतरावर भाष्य केले. साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यात नसल्यामुळे आता परिषदेचे कामकाज चांगले होईल. गेली तीन वर्षे संमेलनासाठी ‘नवा बकरा’ शोधायचा एवढेच काम झाले. आता एकही संमेलन घ्यायचे नसल्याने ही कटकट संपली आहे. मात्र, विभागवार संमेलनांची संख्या वाढवून ग्रामीण भागातील लेखकांना परिषदेशी जोडून घ्यावे, अशी अपेक्षाही फुटाणे यांनी व्यक्त केली.
सरंजामी वृत्ती असल्यामुळे परिषदेतील वातावरण असहिष्णू होते. संसदीय स्वरूपाची टीका समजून घ्यावी. मनाचा निर्मळपणा असेल तर आधी केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत, अशी भावना राजन खान यांनी व्यक्त केली.
जुने उपक्रम नव्या स्वरूपात
शतकोत्तर दशकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या परिषदेचे बंद पडलेले उपक्रम नव्या स्वरूपात होतील, असे प्रा. मििलद जोशी आणि प्रकाश पायगुडे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त आंबेडकरी विचारांना वाहिलेले विभागीय संमेलन असेल. मतदारयादी अद्ययावत करणे आणि परिषदेची घटनादुरुस्ती या गोष्टींना प्राधान्य देणार आहे. शतकपूर्ती केलेल्या भरत नाटय़ मंदिरला केले तसे अर्थसाहाय्य परिषदेला मिळावे यासाठी सरकारशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.