दिव्यांगांच्या वाहनासाठी ‘एआरएआय’कडे प्रस्ताव देणार

भंगारातील साहित्यामधून पेट्रोल-डिझेलचा वापर न करता दिव्यांग व्यक्तींनाही सहजगत्या चालविता येईल असे प्रदूषणमुक्त ‘इलेक्ट्रिक ट्राइक’ हे वाहन प्रकाश उदास यांनी बनविले आहे. ट्राइकला विशेषत: दिव्यांगाकरिता परवानगी मिळावी यासाठी ‘ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’कडे  (एआरएआय) प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिकल सिस्टिमची निर्मिती करणाऱ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीने संशोधन आणि विकास करण्यासाठी या इलेक्ट्रिक ट्राइकची मागणी केली आहे.

दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि पिंपळे गुरवमध्ये एलईडी साइन बोर्ड बनविण्याचा व्यवसाय असलेल्या प्रकाश सीताराम उदास यांनी भंगार साहित्यामधून पेट्रोल डिझेलचा वापर न करता प्रदूषणमुक्त  इलेक्ट्रिक ट्राइक बनविली आहे. काशीद पार्क येथे त्यांचा एलईडी साइन बोर्ड बनविण्याचा कारखाना आहे. एलईडी साइन बोर्ड बनविण्यासाठी लोखंडी पाइपचा वापर  केला जातो. बोर्ड बनविल्यावर लोखंडी पाइपचे तुकडे भंगारात दिले  जात असत. या लोखंडी पाइपपासून काय करता येईल, असा प्रश्न उदास यांना पडला. नावीन्य आणि उत्सुकतेच्या बळावर उदास यांनी इंटरनेटची मदत घेत पाइपपासून नवनिर्मितीचा ध्यास घेतला. व्यवसाय सांभाळून त्यांनी इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या ट्राइकची निर्मिती केली.

सर्वप्रथम बॉडी डिझाईन (चासिस) तयार करून वर्कशॉपमध्ये उरलेल्या पाइपच्या तुकडय़ांपासून ट्राइकचा सांगाडा तयार करण्यात आला. पुढील बाजूस दोन चाके आणि मागील बाजूस एक चाक अशी इलेक्ट्रिक ट्राइकची रचना आहे. ट्राइकमध्ये ४८ वोल्टची लीड अ‍ॅसिड बॅटरी, एक हजार मेगावॉटची मोटार, कंट्रोलर असून ते दोन चाकांच्यामध्ये बसवण्याची स्वतंत्र रचना करण्यात आली आहे.

या वाहनावर अजूनही विविध प्रयोग सुरू आहेत. ट्राइकला हेडलाइट, हॉर्न, सीट, स्टिअरिंग, साइड ग्लास याबरोबरच मागे नेण्याचीही सुविधा आहे. दोन तास बॅटरी चार्ज केल्यानंतर हे वाहन ३५ किमी अंतर पार करते. ट्राइकच्या निर्मितीसाठी जवळपास ५० हजार रुपयांचा खर्च आला आहे.

प्रकाश उदास म्हणाले, मी यापूर्वी बॅटरीवर चालणारी दुचाकी बनविली होती. इलेक्ट्रिक ट्राइक दिव्यांगांचे वाहन व्हावे यासाठी ‘एआरएआय’कडे परवानगी मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करणार आहे.

ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिकल सिस्टिमची निर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीने संशोधन आणि विकास करण्यासाठी इलेक्ट्रिक ट्राइकची मागणी केली आहे. सध्या मी समुद्र किनारी, रिसॉर्टमध्ये आणि गोल्फ कोर्ट या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर काम करत आहे.

‘इलेक्ट्रिक ट्राइक’ची वैशिष्टय़े

* पेट्रोल आणि डिझेलचा वापर नसल्याने प्रदूषणमुक्त वाहन

* दिव्यांग व्यक्तीला वाहन चालविणे सुलभ

* कमी जागेत वाहन वळण्याची सुविधा

* पार्किग करण्यासाठी कमी जागेचा वापर

* शेतीची अवजारे ट्राइकला जोडून शेतकऱ्यांना ट्राइकचा वापर करणे सुलभ