‘इलेक्ट्रिक’ दुचाकी आता पूर्वीइतक्या नवीन राहिलेल्या नाहीत. ‘जेमतेम २५-३० किमी प्रतितास वेगाने पळणारी बाईक हवीय कुणाला,’ अशा हेटाळणीयुक्त सुरात पालट होऊन ‘पर्यावरणपूरक’ म्हणून या दुचाकी अनेकांना आकर्षित करू लागल्या आहेत. यात ‘मिरॅकल ५’ असे नाव लिहिलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यावर पाहिल्या असतील. पण हा ‘ब्रँड’ पुण्याचा आहे, हे माहीत आहे का?

भारतात इलेक्ट्रिक दुचाकी हा प्रकार २००४च्या सुमारास आला. अजूनही ग्राहक पटकन इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यास तयार होत नाहीत. ‘चार्जिग’ची सोय काय, दुचाकीचे चार्जिग मध्येच संपले तर काय, फार वेग न पकडणाऱ्या या गाडीसाठी एवढी किंमत कशाला मोजायची, असे असंख्य प्रश्न डोक्यात असतात. ते अगदी साहजिक आहेत. तरीही गेल्या बारा वर्षांत ‘पर्यावरणपूरक’ म्हणून या गाडय़ांकडे पाहण्याची दृष्टी बदलली हे मात्र खरे. या गाडय़ांमध्ये ‘मिरॅकल ५’ असे नाव लिहिलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यावर बघायला मिळाल्या असतील. इलेक्ट्रिक दुचाकींचा हा ब्रँड पुण्याचा आहे.

‘मिरॅकल’चे मालक भूषण शहा यांच्या घरात १९७७ पासून बजाज कंपनीची डीलरशिप होती. दुरुस्ती आणि सुटे भाग पुरवणे असा त्यांचा व्यवसाय होता. भूषण शहा यांनी १९९० पासून त्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये ‘भूषण एंटरप्रायझेस’ या नावाने व्यवसाय सुरू करून ते बजाजच्या गाडय़ांची विक्रीही करू लागले. २००५ पर्यंत ही डीलरशिप सुरू राहिली. त्याच दरम्यान इलेक्ट्रिक दुचाकी देशात आल्या होत्या. भूषण शहांच्या एका मित्राने एक इलेक्ट्रिक दुचाकी घेतली होती. पण त्यात काही त्रुटी असल्यामुळे दुरुस्तीसाठी तो वारंवार शहांकडे येई. ती दुचाकी पाहताना तशा प्रकारची गाडी आपणही बनवू शकू असे त्यांना वाटले. २००५ मध्ये ते चीनमध्ये गेले आणि तिथे त्यांना इलेक्ट्रिक दुचाकी अगदी घराघरांत पोहोचल्याचे पाहायला मिळाले. चीनमध्ये घरगुती कारखान्यांमध्येही त्यांची निर्मिती केली जात होती. भारतात इलेक्ट्रिक दुचाकी कशी हवी, याचा विचार करून शहा यांनी चीनमधील उत्पादकांकडून दुचाकीचे भाग बनवून घेतले आणि ‘मिरॅकल ५’ या ब्रँड नावाने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आली. २००८ मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक मोटारसायकलही बनवली. त्यातील मात्र ९० टक्के सुटे भाग भारतीय असल्याचे शहा सांगतात. ही मोटारसायकल अजून बाजारात आलेली नाही, पण ‘४८ व्होल्ट’ आणि ‘६० व्होल्ट’ क्षमतेच्या अशा दोन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आहेत. त्याचे काही सुटे भाग चीनमधून येतात, तर काही भाग भारतीय बनावटीचे आहेत. कात्रजमधील उत्पादन प्रकल्पात या गाडय़ा तयार होतात.

इलेक्ट्रिक दुचाकींच्या बॅटरीवर या वाहनांचे बरेच काही अवलंबून असते. आधी या वाहनांसाठी ‘लेड अ‍ॅसिड बॅटरी’ वापरली जात असे. या बॅटरीचे वजन जास्त असते आणि त्याचे आयुष्यही जवळपास दोन वर्षांचेच असते. आता मात्र हलक्या ‘लिथियम आयन बॅटरी’ आल्या आहेत. या बॅटरीचे आयुष्य पाच वर्षांपर्यंत मिळते. सध्या ‘मिरॅकल ५’च्या दुचाकी ‘लेड अ‍ॅसिड बॅटरी’वरील आहेत, पण येत्या तीन महिन्यांत ‘लिथियम आयन बॅटरी’च्या दुचाकी आणण्याच्या ते प्रयत्नात आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींची बॅटरी ७ ते ८ तासांसाठी चार्ज केल्यावर ४८ व्होल्टची दुचाकी ५५ ते ६० किमी चालते, तर ६० व्होल्टची दुचाकी ८० ते ९० किमी चालते. या दोन्ही गाडय़ांवर २२० किलो वजन बसू शकते, तसेच त्याच्या ७ ते ८ तासांच्या चार्जिगला केवळ ३ ते ४ रुपये लागतात, असे शहा सांगतात. इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज कशी करायची हा सामान्यांपुढचा मोठा प्रश्न असतो. पण आपण मोबाइलसारख्या उपकरणांसाठी जो ‘चार्जिग पॉइंट’ वापरतो, तोच ५ अ‍ॅम्पिअरचा चार्जिग पॉइंट या गाडय़ांना चालतो. सध्याच्या ‘मिरॅकल ५’ दुचाकींची बॅटरी गाडीत ठेवूनच चार्ज करावी लागत असली तरी आपल्या घराच्या आतून पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीपर्यंत जाणारी वायर व चार्जिग पॉइंट करून घेता येतो. साधारणत: १६ रुपये मीटर असा या वायरिंगचा खर्च येतो, अशी माहितीही शहा देतात. या दुचाकींचा वेग २५ ते ३० किमी प्रतितास आहे. शिवाय त्या चालवण्यासाठी वाहन परवान्याची गरज भासत नाही.

इलेक्ट्रिक मोटारसायकलसह मोटारसायकल आणि स्कूटरचे एकत्रित रूप असलेले एक ‘कॉम्बिनेशन मॉडेल’, अपंग व्यक्तींसाठी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर, लहान विक्रेत्यांसाठी थ्री-व्हीलर गाडी आणि इलेक्ट्रिक स्कूटरला सोलर पॅनल लावून तयार केलेली ‘सोलर इलेक्ट्रिक  बाईक’ अशी काही उत्पादने बाजारात आणणार असल्याचे शहा यांनी सांगितले. या सोलर बाईकची संकल्पनाही मोठी आकर्षक आहे. सूर्यप्रकाशात दुचाकीची बॅटरी चार्ज करून ती ४० किमी चालवता येईल आणि रात्री त्याच बॅटरीवर घरातील पंखा व दिवेही लावता येतील, अशी त्याची रचना आहे. ‘मोटारसायकल कम स्कूटर’चे मॉडेलही नावीन्यपूर्ण आहे. त्याच्या सीटची उंची कमी-जास्त करता येते, शिवाय ही गाडी सोडवून सुटी करून बरोबर नेता येते आणि सहजतेने पुन्हा जोडता येते, असे शहा सांगतात. मोटारसायकल आणि ‘कॉम्बिनेशन’ बाईकचा वेगही ६० ते ८० किमी प्रतितासपर्यंत असणे नियोजित आहे, असे ते म्हणतात.     सध्या महाराष्ट्रात ‘मिरॅकल ५’चे आठ डीलर्स आहेत. बाहेर बंगळुरूमध्येही डीलर असून हैदराबाद आणि आंध्र प्रदेशमध्येही गाडय़ा पुरवण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात त्यांना गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये डीलरशिप्स सुरू करायच्या आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या धोरणामुळे आता या व्यवसायातील स्पर्धा वाढते आहे. पूर्वी इलेक्ट्रिक गाडय़ा बनवणाऱ्या व काही कारणाने व्यवसाय बंद करावा लागलेल्या कंपन्या किंवा अगदी नवीन कंपन्याही त्यात येत आहेत. जेव्हा शहा इलेक्ट्रिक दुचाकीच्या व्यवसायात आले तेव्हा त्यांना स्पर्धा नव्हती असे नाही. अनेक मोठय़ा कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवत होत्याच.

गुजरातमधील ‘यो-बाईक’ या इलेक्ट्रिक दुचाकी होत्या. महाराष्ट्रातही कोल्हापूरमध्ये एक कंपनी होती, इतरही काही व्यावसायिक होते. पण या स्पर्धेत ‘मिरॅकल ५’

टिकले. ते महाराष्ट्राबाहेर तर पोहोचलेच, पण अनेक नावीन्यपूर्ण कल्पना त्यांनी बाईक्सच्या रूपाने समोर आणल्या. या नावीन्यासाठी पुण्याचा हा ‘ब्रँड’ उल्लेखनीय ठरतो.

sampada.sovaniexpressindia.com