21 November 2019

News Flash

महावितरणचा अनागोंदी कारभार, विजेची तार थेट टेकली जमिनीला

या सगळ्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे असाही आरोप होतो आहे

पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. वीज तार थेट जमिनीला टेकते आहे. याबाबत विचारले असता महावितरणचे अधिकारी उद्धटपणे उत्तर देत आहेत. अवघ्या काही फुटांवर वीज तार लटकत असताना अधिकारी मात्र डोळेझाक करत आहेत. एखाद्या माणसाचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न विचारला जातो आहे.

दरम्यान, शेतकऱ्याने अनेकदा अधिकाऱ्यांना सांगून ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय. पिंपरी चिंचवडमधील चोवीसावाडी परिसरात रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे या शेतकऱ्याच्या शेतात चक्क विजेची तार थेट जमिनीपासून काही फुटांवर आली आहे. मनुष्यवस्ती असल्याने त्या ठिकाणाहून अनेक वेळा नागरिक ये-जा करतात. त्यामुळे जीविहानी होण्याची भीती शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. संबंधित शेतकऱ्यांचे तिथे बांधकाम सुरू असून गेल्या अनेक वर्षांपासून तार तशाचप्रकारे अपघाताला निमंत्रण देत असल्याचे ते म्हणतात. विद्युत महावितरणचे अधिकारी रमेश सुळ यांच्याकडे संबंधित प्रकारा विषयी तक्रार केली आहे.परंतु याकडे दुर्लक्ष करत डोळेझाक केली असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

आषाढी वारीनिमित्त श्री संत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथे काही दिवसात होणार आहे. लाखो भाविक भक्त हे आळंदीत दाखल होतात. त्यांची सोय विविध ठिकाणी केली जाते. पैकी, शेतकरी येळवंडे हे देखील त्यांची सेवा करत असतात. त्यांचं घर आणि शेत हाकेच्या अंतरावर आहे. विजेच्या तारा जमिनीपासून काही फुटांवर येऊन पोहचल्याने काही अघटित घडू नये अस त्यांचं म्हणणं असून लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी.

रमेश सुळ-महावितरण अधिकारी

“प्रेससाठी कोणतीच माहिती देऊ शकत नाही. तुम्ही आमच्या पीआरओ शी संपर्क करा”

First Published on June 20, 2019 2:32 pm

Web Title: electric wire loose in pimpri chinchwad mahavitaran did not care scj 81
Just Now!
X