26 April 2019

News Flash

थकबाकीदारांची वीज तोडण्यासाठी ‘एसएमएस’द्वारे कायदेशीर नोटीस

पुणे विभागात ९५ टक्के ग्राहकांना मोबाइलद्वारे वीजविषयक संदेश

(संग्रहित छायाचित्र)

पुणे विभागात ९५ टक्के ग्राहकांना मोबाइलद्वारे वीजविषयक संदेश

महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये ९५ टक्क्य़ांहून अधिक वीजग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली असल्याने या ग्राहकांना वीज देयक किंवा वीजविषयक विविध एसएमएस पाठविण्यात येत आहेत. त्यात आता थकबाकीदारांची वीज तोडण्यासाठी देण्यात येणाऱ्या कायदेशीर नोटीसचाही समावेश झाला आहे. या नोटीसच्या माध्यमातून थकीत वीज देयक भरण्याबाबत ग्राहकाला सूचना मिळण्याबरोबरच वीज तोडण्यापूर्वीची कायदेशीर प्रक्रियाही सुलभ झाली आहे.

वीज देयकाची थकबाकी असल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणला करता येते. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी वीज कायद्यानुसार संबंधित ग्राहकाला पंधरा दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे. यापूर्वी थकबाकीदार ग्राहकाच्या पत्त्यावर नोटीस पाठवावी लागत होती. त्यासाठी यंत्रणा आणि कागदाचाही खर्च करावा लागत होता. अनेकदा नोटीस न देताही महावितरणचे कर्मचारी थकबाकीदाराचा वीजपुरवठा बंद करीत होते. त्यातून काही वेळेला वादाचे प्रसंगही निर्माण झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर वीज तोडण्यापूर्वीची १५ दिवसांची नोटीस ग्राहकाला डिजिटल माध्यमातून देण्यास परवानगीबाबत महावितरणकडून राज्य वीज नियामक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती.

त्याला काही दिवसांपूर्वी आयोगाने परवानगी दिली. त्यामुळे संबंधित नोटीस एसएमएस किंवा ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला. पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील थकबाकीदार वीजग्राहकांना काही दिवसांपासून एसएमएसद्वारे कायदेशीर नोटीस पाठविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

मोबाइल क्रमांक नोंदणीत आघाडी

वीज ग्राहकाला एसएमएसद्वारे वीजविषयक विविध माहितीचे एसएमएस पाठविण्यासाठी राज्यभर ग्राहकाच्या मोबाइलची नोंदणी करण्यात येत आहे. त्यात पुणे विभागानेही आघाडी घेतली आहे. पुणे परिमंडलात पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीमध्ये २७ लाख २४ हजार वीज ग्राहक आहेत. त्यातील २५ लाख २६ हजार ग्राहकांच्या मोबाइलची नोंदणी झाली आहे.

First Published on February 12, 2019 3:06 am

Web Title: electricity bill on sms