ऑनलाइन ग्राहकांची संख्या पाच लाखांच्याही पुढे
नव्या व सुलभ तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात अग्रेसर असलेल्या पुणेकर वीजग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरणा करण्यात एक नवा विक्रम केला आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी मे महिन्यामध्ये ऑनलाइन यंत्रणेद्वारे तब्बल १०९ कोटी ४० लाख रुपयांचे वीजबिल भरले आहे. महावितरणच्या संकेतस्थळाबरोबरच मोबाइल अ‍ॅपद्वारे ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे पुणेकरांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरणा प्रथमच शंभर कोटींच्या पुढे गेला आहे.
महावितरणच्या http://www.mahadiscom.in   या संकेतस्थळावर ऑनलाइन वीजबिल भरणा करण्याची सुविधा लघुदाब ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातून ग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तसेच नेटबँकिंगच्या माध्यमातून वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. वीजबिल भरण्यासाठी वेळ खर्च करून रांगेत उभे न राहता घरबसल्या कुठूनही वीजबिल भरता येत असल्याने थोडय़ाच कालावधीत पुणेकर ग्राहकांनी या सुविधेला भरभरून प्रतिसाद दिला.
गणेशखिंड मंडलात ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्यांची संख्या मे महिन्यात २ लाख ४ हजारांवर पोहोचली. या ग्राहकांनी ४३ कोटी ४९ लाखांच्या बिलाचा भरणा केला. पुणे परिमंडलात सर्वाधिक िपपरी विभागात ९६ हजार ८४२ ग्राहकांनी १६ कोटी ५२ लाखांचा वीजबिल भरणा ऑनलाइन केला. शिवाजीनगर विभागात ५४ हजार ३२० ग्राहकांनी १४ कोटी ८४ लाख, भोसरी विभागात ४८ हजार १७१ ग्राहकांनी १२ कोटी ४० लाखांचे वीजबिल ऑनलाइन भरले. रास्ता पेठ मंडलातील २ लाख ४ हजार ग्राहकांनी मे महिन्यात ४३ कोटी ४९ लाखांच्या वीजबिलांचा ऑनलाइन वीजबिल भरणा केला. त्यात सर्वाधिक म्हणजे ११ कोटी ९६ लाख रुपयांचा भरणा बंडगार्डन विभागातील ग्राहकांनी केला. नगर रस्ता विभागातून ९ कोटी ८९ लाख, पर्वती विभागातून ७ कोटी ८१ लाख, रास्ता पेठ विभागात ७ कोटी ५६ लाख व पद्मवती विभागात ६ कोटी २६ लाख रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.