सातत्याने आवाहन करूनही सलग दहा महिने वीजबिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांबाबत महावितरणकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण विभागातील अशा प्रकारच्या ३६ हजार १३९ ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. या ग्राहकांकडे ८९ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, १ फेब्रुवारीपासून पुणे विभागात वीजबिल भरणाऱ्यांची संख्याही सध्या वाढली असून, १ एप्रिल २०२० पासून एकही वीजबिल न भरलेल्या ९७ हजार ४१३ ग्राहकांनी आतापर्यंत १४५ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

टाळेबंदीनंतरच्या काळात अभूतपूर्व थकबाकी झाल्याने महावितरणची स्थिती ही वीजखरेदी, दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती खर्च, कर्जाचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत राहिलेली नाही. त्यामुळे नाइलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १० लाख ८ हजार ७७६ ग्राहकांकडे ८१९ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती ८ लाख ४९ हजार ९९० ग्राहकांकडे ५०५ कोटी २३ लाख, वाणिज्यिक १ लाख ३८ हजार ६४८ ग्राहकांकडे २११ कोटी ७० लाख, औद्योगिक २० हजार १३८ ग्राहकांकडे १०२ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर थकबाकी भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये पुणे परिमंडलातील ९७ हजार ४१३ ग्राहकांनी १४५ कोटी ७५ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. यामध्ये घरगुती ६६,१७९ ग्राहकांनी ५५ कोटी ५९ लाख, वाणिज्यिक २८ हजार ५ ग्राहकांनी ६३ कोटी ८० लाख आणि औद्योगिक ३,२२९ ग्राहकांनी २६ कोटी ३६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला सहकार्य करून चालू आणि थकीत वीजबिलांचा भरणा करावा. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र १९ ते २१ फेब्रुवारीपर्यंत सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

कुणाकडे किती थकबाकी..

पुणे परिमंडलात १ एप्रिल २०२० पासून एकही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांवर सध्या कारवाई सुरू आहे. १७ फेब्रुवारीपर्यंत पुणे शहरातील  १९,३८८ ग्राहकांकडे ४२.१७ कोटी, पिंपरी- चिंचवड शहरात ९,८८५ ग्राहकांकडे २४.९० कोटी आणि हवेली ग्रामीण, मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, मावळ आणि खेड तालुक्यातील ६,८६६ ग्राहकांकडे २२.४८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये घरगुती १३,६५०, वाणिज्यिक २०,२३३ तर औद्योगिक २,२५६ ग्राहकांचा समावेश आहे.