वीजचोरांच्या विरोधात महावितरण कंपनीने उघडलेल्या मोहिमेमध्ये मोठमोठे वीजचोर हाती लागत असतानाच पुण्यातील सर्वात मोठी वीजचोरी शोधून काढण्यातही ‘महावितरण’ला यश मिळाले आहे. वडगाव धायरी येथील एका बर्फाच्या कारखान्यामध्ये तब्बल २७ लाख रुपयांच्या विजेची चोरी उघड झाली आहे. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने मीटरमधील विजेची नोंद थांबवून ही चोरी करण्यात येत होती. बडय़ा चोरांविरुद्धच्या या मोहिमेमध्ये आतापर्यंत केवळ सहाच प्रकरणांमध्ये ६५ लाखांची वीजचोरी उजेडात आली आहे.
महावितरण कंपनीने चारच दिवसांपूर्वी दुसऱ्या एका बर्फाच्या कारखान्यातील १२ लाख रुपयांच्या विजेची चोरी उघडकीस आणली होती. त्याही प्रकरणात रिमोट कंट्रोलच्या वापरातून चोरी करण्यात येत होती. त्यानंतर लगेचच अशाच प्रकारची दुसरी व सर्वात मोठी वीजचोरी सापडली आहे. ‘कमोदिनी आइस प्लँट’ असे वीजचोरी सापडलेल्या कारखान्याचे नाव आहे. इंद्रजित बाबासाहेब घुले हे या कारखान्याचे मालक आहेत. महावितरणकडे असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील वीजयंत्रणेची तपासणी केली.
कारखान्यातील वीजयंत्रणेमध्ये बेमालूमपणे फेरफार करून या यंत्रणेत रिमोट कंट्रोलच्या सर्किटचा समावेश करण्यात आला होता. कारखान्यात विजेचा वापर होत असला, तरी त्याची नोंद मीटरमध्ये होऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली होती. रिमोटच्या साहाय्याने हव्या त्या वेळेला विजेची नोंदणी बंद करण्याची व्यवस्था कारखान्याने केली होती. वीजयंत्रणेतील हा सर्व घोळ महावितरणने शोधला. गेल्या २२ महिन्यांमध्ये या कारखान्यात तब्बल एक लाख ९१ हजार ९१८ युनिट विजेची चोरी करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी कारखान्याच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, रमेश मलामे, कार्यकारी अभियंता उदय चामले, दत्तात्रय बनसोडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप कोकणे, विजय सूर्यवंशी, सहायक अभियंता शिविलग बोरे, तंत्रज्ञ शैलेश बनसोडे, राम पवार यांनी ही चोरी उघड केली.
बडय़ा वीजचोरांविरुद्ध मोहीम उघडल्यानंतर मागील वीस दिवसांमध्ये भोसरी औद्योगिक वसाहतीतील दोन उद्योजक. चाकणमधील एक उद्योजक, एक वाणिज्यिक ग्राहक व दोन बर्फाच्या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सहा प्रकरणांमधील वीजचोरीचा आकडा ६५ लाखांहून अधिक झाला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत.