महावितरणच्या पुणे विभागाने वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई करून मोठमोठय़ा वीजचोरांवर फौजदारी कारवाई केली आहे. पुणे विभागात प्रथमच मोठय़ा प्रमाणावर वीजचोर सापडले असले, तरी त्यांना वीजचोरीसाठी तांत्रिक मदत देणारी मंडळी अद्यापही मोकाट आहेत. वीजचोर ग्राहक सापडत असताना त्याबरोबरीने तांत्रिक घोटाळा करून देणारी मंडळीही सापडणे आवश्यक आहे. अन्यथा, वीजचोऱ्यांना पूर्णपणे आळा घालणे शक्य होणार नसल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरणच्या पुणे परिमंडलचा कार्यभार मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी स्वीकारल्यानंतर बडय़ा वीजचोरांना पकडण्याचे स्वागतार्ह काम त्यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला मागील तीन महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणावर यश आले आहे. सुमारे साडेतीन ते चार कोटींपर्यंतची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. या वीजचोरांमध्ये मोठे कारखानदार, बर्फाचे कारखाने, हॉटेल व्यावसायिक, सोसायटय़ा व घरगुती ग्राहकही आहेत. या वीजचोऱ्या पकडण्यासाठी महावितरणचे तंत्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळय़ा पद्धती वापरल्या आहेत. वेगवेगळय़ा वीजग्राहकांचा व त्यांच्या वीजवापराचा सातत्याने अभ्यास करण्यात आला. त्यातून आजही शहरात व ग्रामीण भागामध्ये वीजचोर सापडत आहेत.
विजेच्या यंत्रणेमध्ये रिमोटचे सर्किट बसवून रिमोटद्वारे होणाऱ्या वीजचोऱ्या प्रामुख्याने पकडण्यात आल्या आहेत. रिमोटच्या साहाय्याने हव्या त्या वेळेला मीटरमधील विजेची नोंद थांबवली जात होती. असा प्रकार पुण्यामध्ये प्रथमच मोठय़ा प्रमाणावर आढळून आला. त्याबरोबरीने यंत्रणेत फेरफार करून मीटरच्या रीडिंगचा वेग कमी करण्याचे प्रकारही घडले आहेत. मीटर नसताना थेट महावितरणच्या यंत्रणेतून परस्पर वीज घेण्याचे प्रकारही काही ठिकाणी उघडकीस आले आहेत.
यंत्रणेत फेरफार करणे किंवा रिमोटचे सर्किट बसविण्याचे प्रकार संबंधित ग्राहकांनी कुणाकडून तरी करवून घेतले असल्याचे उघड आहे. त्याचप्रमाणे महावितरणच्या यंत्रणेतून थेट वीज घेण्याचा प्रकार त्या यंत्रणेची तांत्रिक माहिती असणाऱ्यांकडूनच केला गेला असल्याचेही स्पष्ट आहे. त्यामुळे वीजचोरीसाठी मीटरमध्ये फेरफार किंवा इतर काही तांत्रिक गोष्टी करून घेणाऱ्या ग्राहकाबरोबरच त्या करून देणारी मंडळीही पकडली जाणे आवश्यक आहे.
त्या दृष्टीने पोलिसांना तपासच नाही
वीजचोरी पकडल्यानंतर संबंधिताकडून महावितरण दंड व चोरीच्या विजेच्या पैशाची पुरेपूर वसुली करते. त्याचप्रमाणे संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल होतो. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून संबंधित ग्राहकाची चौकशी होऊन वीजचोरीसाठी तांत्रिक मदत देणाऱ्यांचा तपास होणे गरजेचे आहे. असे झाले, तर मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप एकाही प्रकरणात तांत्रिक मदत देणारे सापडले नाहीत. मुळात त्या दृष्टीने तपासच होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.