13 December 2017

News Flash

विजेवर चालणारी सर्व प्रकारची वाहने पुण्यात एकाच छताखाली!

प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी या बाबतची माहिती दिली.

प्रतिनिधी, पुणे | Updated: October 7, 2017 5:30 AM

‘आरटीओ’मध्ये उद्या प्रदर्शन; देशभरातील उत्पादकांचा सहभाग

इंधनावर धावणाऱ्या वाहनांमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर उपाय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला सध्या प्रोत्साहन देण्यात येत आहे. वाहन उत्पादकांकडूनही अशा प्रकारची वाहने तयार करण्यात येत आहेत. विजेवर चालणारी ही सर्व प्रकारची वाहने पुण्यात एकाच छताखाली पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने उत्पादकांच्या सहकार्याने रविवारी (८ ऑक्टोबर) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुचाकीपासून बसपर्यंतच्या वाहनांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी या बाबतची माहिती दिली. इंधनाचा वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न बिकट होत असताना विजेवर चालणारी पूर्णपणे प्रदूषणमुक्त वाहनांची संख्या वाढविण्याचे धोरण सध्या आखण्यात येत आहे. विजेवर चालणारी ही वाहने नागरिकांना प्रत्यक्ष पाहता यावीत, त्यांच्या मनातील विविध प्रश्नांचे समाधान व्हावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आरटीओ आणि इलेट्रिकल्स व्हेईकल्स असोसिएशनच्या वतीने संगम पुलाजवळील पुणे आरटीओ कार्यालयाच्या आवारात सकाळी साडेदहा ते संध्याकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे.

टाटा मोटर्स, महिंद्रा, कायनेटिक आदींसह देशभरातील सुमारे २५ वाहन उत्पादकांकडून प्रदर्शनामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांची मांडणी करण्यात येणार आहे. जवळपास पन्नास प्रकारची वाहने प्रदर्शनात असतील. त्यात वेगवेगळय़ा दुचाकी, मोटार, रिक्षा, माल वाहतुकीतील वाहने आणि बसचाही समावेश असणार आहे. उत्पादकांकडून वाहनांच्या माहितीचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नागरिकांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही मिळू शकणार आहेत.

राज्यामध्ये अशा प्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन होत असून, प्रदर्शनासह अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यात केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून ‘इलेक्ट्रॉनिक सिनॅरिओ इन इंडिया’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन ‘एआरएआय’च्या संचालिका रश्मी ऊध्र्वरेषे यांच्या हस्ते होईल. नव्या तंत्रज्ञानाची आवड असणारे नागरिक, विद्यार्थी, अभ्यासकांसाठी हे प्रदर्शन चांगली संधी असून, ते सर्वासाठी मोफत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आजरी यांनी केले.

First Published on October 7, 2017 5:30 am

Web Title: electricity vehicle pune rto