पुणे : कर्णबधिर विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटी सवलतीच्या आधारे अकरावीला प्रवेश देण्यास आणि अकरावीच्या शैक्षणिक वर्षात दहावीचा इंग्रजीचा विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे एटीके टी सवलतीचा लाभ घेऊन अकरावीत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाने कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एटीके टी सवलतीद्वारे अकरावीच्या प्रवेशाचा आणि अकरावीच्या वर्षात दहावीचा इंग्रजी विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होण्याचा निर्णय २०१६मध्ये घेतला होता. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेपैकी कोणत्याही शाखेत येणाऱ्या कर्णबधिर, बहुविकलांग, स्वमग्न, अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना दोन भाषा, चार ऐच्छिक विषय अशा सहा विषयांऐवजी एक भाषा आणि पाच ऐच्छिक विषय घेण्याची परवानगी देण्यात आली.

अकरावी प्रवेशाच्या निकषानुसार दहावी अथवा समकक्ष परीक्षेत इंग्रजी विषयासह किमान पाच विषय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्णबधिर विद्यार्थ्यांसह इतर सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीके टी सवलतीद्वारे अकरावी प्रवेश देण्यास आणि अकरावीच्या शैक्षणिक वर्षात दहावीचा इंग्रजी विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव होता.

या पार्श्वभूमीवर अंशत: अंध, पूर्ण अंध, गतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग, अध्ययन अक्षम, सेलेब्रल पाल्सी अशा सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीके टी सवलतीच्या आधारे अकरावीला प्रवेश देण्यास आणि अकरावीच्या शैक्षणिक वर्षात दहावीचा इंग्रजीचा विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.