पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. जास्त गुण असूनही प्राधान्यक्रम न मिळणे, रिक्त जागांची माहिती न मिळणे असे प्रकार होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीमार्फत अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत आजवर दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली. तिसऱ्या गुणवत्ता यादीत बहुतांश महाविद्यालयांतील कटऑफ गुण कमी झाले आहेत. असे असूनही अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडले आहेत.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नेमक्या कशा पद्धतीने प्रवेश होतात हे कळलेले नाही. ८० टक्के, ९१ टक्के असे गुण असूनही प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालय मिळत नाही. २ ते १० प्राधान्यक्रमात दूरचे महाविद्यालय मिळते. रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर मिळत नाही. त्यामुळे फेरीनंतर प्राधान्यक्रम बदलताना अडचण येते,असे पालकांचे म्हणणे आहे.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरीबाबत सचिव स्तरावर निर्णय?

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी गुणवत्तेच्या निकषावर राबवण्याची मागणी प्रवेश नियंत्रण समितीकडे करण्यात आली आहे. या फेरीमध्ये गुणवत्ता डावलली जाऊन गैरप्रकार होतात, त्यातून गोंधळ निर्माण होत असल्याचे मनविसेचे म्हणणे आहे. या मागणीची दखल घेऊन समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांना पत्र पाठवून निर्णय घेण्याबाबत कळवले आहे.

प्रत्येक महाविद्यालयाचा कटऑफ वेगळा असतो. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक प्राधान्यक्रम भरणे आवश्यक असते. प्रत्येक फेरीच्या रिक्त जागा आणि कटऑफ गुण संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.

– मीनाक्षी राऊत, अध्यक्षा, केंद्रीय प्रवेश समिती