१५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान शेवटची प्रवेश फेरी

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपता संपत नसल्याचे चित्र आहे. अजूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शेवटची प्रवेश फेरी जाहीर करण्यात आली आहे. १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीद्वारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड  परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी  प्रवेशासाठी आठ फेऱ्या राबवण्यात आल्या. २९६ महाविद्यालयांमध्ये १ लाख ४ हजार १३९ जागा उपलब्ध होत्या. प्रवेश प्रक्रियेत एकूण ६७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर ३६ हजार २३७ जागा रिक्त राहिल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच प्रवेश प्रक्रिया संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अजूनही काही विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता आलेला नाही. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सोडवण्यासाठी अखेरची फेरी घेतली जात आहे.

अद्याप कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या आणि प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत कागदपत्रांसह शिक्षण उपसंचालक कार्यालयात उपस्थित राहावे. या पुढे प्रवेश फेरी होणार नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रवीण अहिरे यांनी केले.