कोरेगाव-भीमा हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, महेश राऊत, शोमा सेन आणि रोना विल्सन यांना न्यायालयाने दि. २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोरेगाव-भीमा येथे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून मुंबई, नागपूर, दिल्लीत कारवाई करण्यात आली होती. कोरेगाव-भीमा हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबईतील गोवंडी भागातून ढवळे यांना अटक केली होती. त्या पाठोपाठ नागपूर येथून अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक करण्यात आली, तसेच दिल्लीतून रोनी विल्सन यांना अटक केली होती. एल्गार परिषदेत करण्यात आलेले चिथावणी देणारे भाषण तसेच सादर करण्यात आलेल्या गीतांमुळे हिंसाचारास खतपाणी मिळाले. त्यामुळे ढवळे, अ‍ॅड. गडलिंग, राऊत, विल्सन, सेन यांच्या घरांवर दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांच्या पथकाने छापे टाकले होते. तेथून काही पुस्तके तसेच भित्तिपत्रके जप्त करण्यात आली होती. पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण ?

भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जमले होते. त्या वेळी दोन गटांत झालेल्या वादातून नगर रस्त्यावर हिंसाचार झाला. शेकडो वाहने पेटवून देण्यात आली, तसेच दगडफेक करण्यात आली होती. ३१ डिसेंबर रोजी पुण्यात शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार परिषदेत चिथावणी देणारी भाषणे दिल्याप्रकरणी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद आणि परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. एल्गार परिषदेच्या आयोजनात सुधीर ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांकडून हिंसाचारप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.