१७ वर्षांपासून वाढवलेल्या जटेला मुक्ती; डोक्यावरील भार हलका झाल्याची भावना

अंधश्रद्धेतून गेल्या १७ वर्षांपासून वाढविलेल्या तीन किलो वजनाच्या जटेचे मंगळवारी निर्मूलन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी मंगळवारी ७५ व्या महिलेला जटेपासून मुक्ती दिली. ‘आता हलकं वाटतंय’, अशी भावना जटामुक्त झालेल्या कलावती परदेशी यांनी व्यक्त केली.

कोंढवा येथे वास्तव्यास असलेल्या कलावती परदेशी यांच्या डोक्यामध्ये १७ वर्षांपूर्वी गुंता झाला होता. त्यातून जट वाढत गेली. ही जट वाढत वाढत पाच फूट लांब झाली. परदेशी म्हणाल्या, ‘हे यल्लम्मा देवीचे आहे. काढू नकोस’, असे मला अनेकांनी सांगितले. मी जट काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा तू जट काढली तर देवीचा कोप होऊन नवऱ्याला, मुलांना त्रास होईल, असेही सांगण्यात आले. तब्बल तीन किलो वजनाची जट वागवताना मला खूप त्रास झाला. एरवी मी डोक्यावर पदर घेऊनच वावरत असल्याने जट असल्याचे फारसे कोणाला माहीत नव्हते. मात्र, रात्री झोपताना केस बाजूला ठेवावे लागत होते. त्यातून मानसिक त्रास आणि चिडचिड होण्याचे प्रमाण वाढले होते. नंदिनी जाधव जट काढण्याचे काम करीत असल्याचे वृत्तपत्रातून मला समजले आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी १५ दिवस माझ्याशी संवाद ठेवला आणि आज हा दिवस उगवला. आता मी आनंदाने जीवन जगेन, अशी आशा कलावती परदेशी यांनी व्यक्त केली.

समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कार्य पुढे नेताना जट निर्मूलनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा विळखा पडलेल्या महिलांची सुटका करण्याचे काम हाती घेतले. ब्युटी पार्लरच्या कामाचा अनुभव मला उपयोगी पडला.

गेल्या चार वर्षांत अंधश्रद्धा  आणि समाजाची भीती दूर करून  पुणे जिल्ह्य़ातील ७५ महिलांची जट काढून त्यांच्या आयुष्यात आनंद देऊ शकले याचे समाधान आहे, असे नंदिनी पाटील यांनी सांगितले. जट निर्मूलनाची लवकरच शताब्दी अंधश्रद्धेपोटी जट निर्मूलन करण्याच्या उपक्रमामध्ये ७५ महिलांच्या डोक्यावरील केसांचा भार हलका करण्यामध्ये यश आले. सध्या २२ महिलांचे समुपदेशन सुरू आहे. त्यामुळे जट निर्मूलनाची शताब्दी लवकरच होईल. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १ नोव्हेंबर रोजी जट निर्मूलन झालेल्या महिलांचा मेळावा आयोजित करण्याचा मानस असल्याचे नंदिनी जाधव यांनी सांगितले.