मुखपट्टी कारवाईत उच्चभ्रूंची अरेरावी

पुणे : ‘मोटारचालकांना मुखपट्टी बंधनकारक नाही. कारवाई कराल तर बघून घेईन, वरिष्ठांकडे तक्रार करीन,’ अशा शब्दात मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना चौकाचौकात दम दिला जात आहे. अशा दमबाजी आणि वादावादीच्या प्रसंगांमुळे   कारवाई करताना पोलीस मेटाकुटीला आले असून या कारवाईला सर्वाधिक विरोध धनदांडग्यांकडून होत आहे.

मुखपट्टी न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी वेगात कारवाई सुरू केली आहे. करोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट दिसून येत आहे. चौकाचौकात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असली, तरी कारवाई करणाऱ्या पोलिसांबरोबर वाद घालण्याचे प्रमाणही मोठे आहे. अशा प्रसंगातही पोलिसांनी संयमाने कारवाई करावी तसेच त्यांनी नागरिकांबरोबर सौजन्याने वागावे, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

गेल्या महिनाभरात पोलिसांनी मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांविरोधात १ लाख ३७ हजार ८२६ खटले दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ६ कोटी ८९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर तसेच सुरक्षित अंतर राखून व्यवहार पार पाडण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चौकाचौकात पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर मुखपट्टी कारवाई प्रभावीपणे करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुखपट्टी न वापरल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येतो. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला विरोध करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. बऱ्याचदा मोटारचालक मुखपट्टीचा वापर करत नाहीत. मोटारचालकावर कारवाई करताना विरोध होतो, तसेच कारवाई करणाऱ्या पोलिसांबरोबर हुज्जत घातली जाते. वर्दळीच्या रस्त्यावर असे प्रसंग घडल्यास वाहतूक विस्कळीत होते. वादावादीच्या प्रसंगामुळे पोलीस मेटाकुटीला येतात, अशा तक्रारी पोलिसांकडून करण्यात आल्या.

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरणे बंधनकारक आहे. नागरिक तसेच वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे.

– डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन)