शहरातील वाहतूक सुधारणेसाठी मेट्रो, बीआरटी, उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते, पदपथ अशी अनेक आश्वासने 31padachari-7पुणेकरांना दिली जात आहेत आणि या योजना साकारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्चही होत आहेत. मात्र, वाहतुकीतील पादचारी या महत्त्वाच्या घटकाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील लाखो पादचाऱ्यांना सांगा कसं चालायचं असा प्रश्न जागोजागी पडत आहे. पुण्यात आता वाहन चालवणे सोपे; पण चालणे अवघड अशी परिस्थिती आहे.
पुण्याच्या वाहतूक सुधारणेचा र्सवकष आराखडा तयार करण्याबाबत राज्य शासनाने सूतोवाच केले असून या आराखडय़ात पुन्हा एकदा मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड यांसह नव्या योजना प्रस्तावित केल्या जातील. मात्र, पीएमपीने प्रवास करणारे लाखो प्रवासी आणि तेवढय़ाच संख्येने असलेल्या पादचाऱ्यांकडे लक्ष देण्याबाबत महापालिका आणि वाहतूक पोलीस या दोन्ही प्रशासकीय यंत्रणांमध्ये मोठी उदासीनता आहे. लाखो रुपये खर्च करून पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यापलीकडे महापालिका काहीही करत नाही, हे शहरातील वास्तव आहे. या पदपथांचा वापर पादचारी खरोखरच करू शकतात का याकडे महापालिका प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.
पदपथांचा अभाव, शहरातील मोठी वाहतूक, दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक यांच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यांवरून चालणे अवघड झाले आहे, असे पूर्वी म्हटले जायचे. मात्र आता ज्येष्ठांनाच काय तरुणांनाही रस्त्यांवरून चालणे आणि रस्ते ओलांडणे अवघड झाल्याची परिस्थिती आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये रस्ते ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखण्यात आलेले असले, तरी तेही शोभेलाच आहेत आणि चौकांमध्ये सिग्नलचे पालन होत नसल्यामुळे तेथेही पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अशक्य झाले आहे.

पादचाऱ्यांना कशाकशाचे अडथळे..?31padchari1
– शासकीय अतिक्रमणे
शहरातील अनेक रस्त्यांवर आणि पदपथांवर पादचाऱ्यांना शासकीय अडथळय़ांना तोंड द्यावे लागते. पीएमपीचे शेकडो थांबे थेट पदपथांवरच उभारण्यात आले आहेत. तसेच वीज वितरण कंपनीचे डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर यांसह महापालिकेची सेवा केंद्रे यांची अतिक्रमणे पदपथांवर झाली आहेत. ही शासकीय अतिक्रमणे असल्यामुळे ती दूर केली जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
नगरसेवकांच्या निधीतील बाक
वॉर्डस्तरीय निधीतून शहरात नगरसेवकांमार्फत जी कामे केली जातात त्यात नगरसेवकांनी बहुतेक ठिकाणी जे बाक दिले आहेत ते पदपथांवर चक्क आडवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पादचाऱ्यांचे मार्गच या बाकांनी अडवले आहेत. या बाकांच्या आधारे अनेक ठिकाणी अनधिकृत टपऱ्या व छोटी हॉटेल सुरू झाली असून हे बाक नगरसेवकांनी दिल्यामुळे तेथे कारवाई होत नाही.
छोटे-मोठे विक्रेते
शहरातील बहुतेक सर्व पदपथांवर छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांनी सर्रास अतिक्रमण केले असून दुकानदारांनीही त्यांचा माल रस्त्यावर वा पदपथांवर मांडून रस्ते अडवले आहेत. पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर यासह अनेक रस्त्यांवर रस्ते व पदपथांचा संपूर्ण वापर व्यावसायिकच करत असून तेथून पादचारी कसेबसे गर्दीतून मार्ग काढत चालताना दिसतात.
 
प्रमुख रस्त्यांवर काय दिसले..?
थोरले बाजीराव रस्ता
अरुंद आणि पार्किंगने भरलेले पदपथ
अरुंद आणि कधी उंच तर कधी सखल असे पदपथ हा बाजीराव रस्त्यावर पादचाऱ्यांसाठीचा प्रमुख अडसर ठरत आहे. शिवाय अनेक ठिकाणी थेट पदपथांवरच केले जाणारे दुचाकी व चारचाकीचे पार्किंग हीदेखील मोठी समस्या आहे. मित्रमंडळ चौकाजवळ सणस प्लाझा शेजारचा पदपथ, अत्रे सभागृहाच्या समोरचा पदपथ, शनिवारवाडय़ाजवळ कडबे आळी भागातील पदपथ या ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांनीच भरून गेलेला दिसतो. सणस मैदानाच्या मागील बाजूस अत्रे सभागृहापर्यंतचा पदपथ खोदकामानंतर उखडलेला आहे. शनिपार भागात गर्दी नियंत्रित करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चालण्यासाठी बॅरिकेड्स घातली आहेत. मात्र सकाळी व संध्याकाळी या भागात होणारी मोठी गर्दी आणि पदपथांवरील पथारीवाले यामुळे अनेकदा नागरिकांना रस्त्यावरून अत्यंत धोकादायक परिस्थितीतून चालावे लागते. मधूनच उंच आणि मधूनच सखल असलेले पदपथ ज्येष्ठ व्यक्तींना चालण्यासाठी त्रासदायक ठरत आहेत.
रस्ता ओलांडणे विसराच!
सारसबागेजवळ वि. दा. सावरकर चौक, अत्रे सभागृहाचा चौक तसेच गणराज हॉटेल व सरस्वती मंदिर शाळेसमोर रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांच्या सहनशक्तीचा कस लागतो. सुसाट धावणाऱ्या वाहनांना हात करत जवळपास धावतच रस्ता ओलांडणारे नागरिक येथे दृष्टीस पडतात. वि. दा. सावरकर चौकात पाटणकर हॉस्पिटलच्या बाजूकडून सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी रस्ता ओलांडायचा असेल, तर पादचाऱ्यांसाठीचा लाल सिग्नल दोन मिनिटांचा आहे. त्यानंतर हिरवा सिग्नल केवळ अवघी दहा सेकंद राहात असल्याने हा रस्तादेखील धावत ओलांडावा लागतो.

सिंहगड रस्ता31padchari3
पदपथांवरूनही होते वाहतूक
सारसबागेपासून सुरू होणाऱ्या सिंहगड रस्त्यावर चालता येतील असे पदपथ अभावानेच आहेत. सारसबाग ते दांडेकर पूल या रस्त्यावरील पदपथ हे दुकाने, देशी दारूचे गुत्ते, बांधकामाचे साहित्य यांनी व्यापले आहेत. दांडेकर पुलापासून एका बाजूला पदपथच नाहीत आणि दुसऱ्या बाजूला पदपथांवरच जुगाराचे अड्डे भरलेले असतात. विठ्ठलवाडी परिसरात रस्त्यालाच भाजी मंडईचे स्वरूप आले आहे. एका बाजूला अर्धा रस्ता व्यापून बसलेले विक्रेते, गाडीवर बसूनच खरेदी करणारे ग्राहक आणि दुसऱ्या बाजूला भरधाव जाणाऱ्या गाडय़ा यातून वाट काढत या रस्त्यावर चालावे लागते. अगदी वडगावपर्यंत हीच परिस्थिती दिसून येते. वडगाव ते पर्वती या रस्त्यावरील पदपथ रुंद आहेत, मात्र त्याचा उपयोग पादचाऱ्यांपेक्षा वाहतूककोंडीतून वाट काढण्यासाठी वाहनचालकच करत असतात. हा रस्ता ओलांडणेही दिव्यच आहे. या रस्त्यावर वॉकवेज आहेत, मात्र काही ठिकाणी वॉकवेजच्या समोरील दुभाजक अखंड आहेत. हिंगणे, विठ्ठलवाडी अशा काही ठिकाणी चौक नसतानाही पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा यासाठी सिग्नल्स बसवण्यात आले आहेत. मात्र, त्याचे पालन होत नाही. आनंदनगरचा चौक, राजाराम पुलाचा चौक या मोठय़ा चौकांच्या मध्यापर्यंत वाहने आलेली असतात, त्यामुळे सिग्नल्स असूनही या ठिकाणी रस्ता ओलांडता येत नाही.

सांगा कसं चालायचं..?31padchari3

पादचारी वाहतुकीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेल्या शहरात पदपथांवरून आणि रस्त्यांवरून चालताना काय अनुभव येतात, कोणत्या समस्यांना पादचाऱ्यांना तोंड द्यावे लागते, त्यावर काय उपाय करता येतील, यासंबंधी पुणेकरांनी पाठवलेल्या अनुभवांचे व सूचनांचे स्वागत आहे. आपले म्हणणे शंभर ते सव्वाशे शब्दांपर्यंत असावे. नाव, पत्ता, संपर्क क्रमांकही देणे आवश्यक.
मजकूर पाठवण्यासाठीचा पत्ता :
संपादक, दै. लोकसत्ता, एक्सप्रेस हाऊस, १२०५/२/६ शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५.
ई मेलवर मजकूर पाठवायचा असल्यास :
loksatta.pune@expressindia.com