रस्त्याच्या कडेची एखादी रिकामी जागा शोधून तिथे खाद्यपदार्थाची गाडी किंवा स्टॉल लावण्याची पुण्यातील जुनी पद्धत आता मागे पडली असून दहा ते पंधरा स्टॉलसाठी लागेल एवढी जागा शोधून तिथे अतिक्रमण करण्याची नवी पद्धत शहरात जागोजागी विकसित झाली आहे. नव्या जागांची निर्मिती करून अशा बेकायदेशीर चौपाटय़ांचे पेव शहरात फुटले आहे आणि त्यातील बहुतेक व्यावसायिकांना स्थानिक नगरसेवक किंवा गुंडाचे अभय आहे.
नगरसेवक, गुंड किंवा नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने अतिक्रमण करून रस्त्याच्या कडेला व्यवसाय सुरू करण्याचा प्रघात शहरात होता. मात्र गेल्या काही महिन्यात या प्रकाराऐवजी एखादी मोकळी आणि महापालिकेची जागा शोधून तिथे दहापंधरा जणांनी एकत्र अतिक्रमण करण्याचा नवा प्रकार शहरात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकाच जागी जेथे अशा गाडय़ा एकत्रित रीत्या सुरू होतात त्यांना चौपाटी म्हणण्याची पद्धत पडली आहे. त्यामुळे रविवार पेठेतील चौपाटी, वडगावची चौपाटी, कल्याणीनगरची चौपाटी अशा नावांनी या गाडय़ा ओळखल्या जात आहेत.
चहा, कॉफी, वडा पाव, भजी, भेळ, पाणीपुरी, पाव भाजी, अंडाबुर्जी, कच्छी दाबेली, शेवपाव, दावणगिरी डोसा, इडली वडा, आइस्क्रीम, गोळा, सरबते असे तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ या गाडय़ांवर मिळतात आणि हे सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे चौपाटय़ांचा धंदाही जोरात आहे. त्यातील अनेक चौपाटय़ांवरील व्यवसाय सकाळीच सुरू होतो आणि दिवसभर या गाडय़ा सुरू असतात, तर काही चौपाटय़ांवर सायंकाळपासून गाडय़ा लावायला सुरुवात होते आणि रात्री बारापर्यंत गाडय़ा सुरू असतात.
व्यवसाय कसा सुरू होतो..?
पुण्यात कोणत्याही भागात आणि कोणत्याही मोकळ्या वा महापालिकेच्या जागेवर स्टॉल किंवा खाद्यपदार्थाची गाडी सुरू करायची असेल, तर स्थानिक नगरसेवक किंवा स्थानिक दादा वा गुंड किंवा नगरसेवकाच्या जवळच्या कार्यकर्त्यांची मदत लागते. अनेक ठिकाणी नगरसेवकांनीच महापालिकेच्या मोकळ्या जागा बरोबर शोधून काढल्या आहेत आणि त्यांनी तेथे स्टॉल टाकून वा गाडय़ा लावून जवळच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे अशा जागांवर नगरसेवकांची अघोषित मालकी असते. या ठिकाणी गाडी वा स्टॉल लावण्यासाठी नगरसेवकाने परवानगी दिल्यानंतरच संबंधिताला व्यवसाय सुरू करता येतो. एकदा नगरसेवकाची परवानगी मिळाली की संबंधित व्यावसायिकाला अन्य प्रशासकीय प्रक्रिया करण्याची कोणतीही गरज उरत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे.
मध्य पुण्यात एका नगरसेवकाने अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांना पूर्ण संरक्षण दिले असून अनेक स्टॉल आणि हातगाडय़ांच्या रूपाने या नगरसेवकाने कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केले आहे.
 पुण्यात सुरू असलेल्या काही चौपाटय़ा
वडगाव फाटा चौपाटी (सिंहगड रस्ता), विवेकानंद पुतळ्याजवळची चौपाटी (सातारा रस्ता), आदिनाथ सोसायटीच्या दारातील चौपाटी (सातारा रस्ता), सारंग सोसायटी कॉर्नर (सहकारनगर परिसर), हिराबाग कॉर्नर (टिळक रस्ता), अपोलो चित्रपटगृहासमोरील चौपाटी (रास्ता पेठ), लालबहादूर शास्त्री चौक (रविवार पेठ), विमानगर परिसर, स्वारगेट बसस्थानक परिसर, कल्याणीनगर, पुणे रेल्वे स्टेशन परिसर, रविवार पेठ बोहरी आळी परिसर, सिंहगड रस्ता भाजी मंडई चौपाटी, कमला नेहरू उद्यान परिसर, फग्र्युसन रस्ता चौपाटी.