अतिक्रमणांचा वेढा, अस्वच्छतेचे साम्राज्य; पालिका अधिकारी, नगरसेवकांचे दुर्लक्ष

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मरणार्थ चिंचवडगावात उभारण्यात आलेल्या शिल्पसमूहास अतिक्रमणांनी वेढा घातला असून या ठिकाणी नेहमीच अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य आढळून येते. शिल्पसमूहाची स्थापना झाल्यापासून हेच चित्र कायम आहे. तथापि, या समस्येकडे पालिका अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवकांकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.

सात वेगवेगळे मार्ग एकत्र येणाऱ्या चिंचवडगावातील प्रमुख चौकात चापेकर बंधूचे शिल्पसमूह आहे. हे शिल्पसमूह होण्यासाठी जवळपास १० ते ११ वर्षांचा प्रवास झाला असून मोठय़ा प्रमाणात खर्चही झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गेल्या वर्षी उद्घाटन झाले. तेव्हाच संभाव्य अतिक्रमणाबाबतीत पवारांनी सूतोवाच केले होते. प्रत्यक्षात काही दिवसांमध्येच तसे दिसू लागले. पुतळा परिसरात अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. पथारीवाले, हातगाडीवाले बेकायदा व्यवसाय करतात. परिसर अस्वच्छ करतात. सायंकाळी सहानंतर चापेकर पुतळा ते गणपती मंदिर या मार्गावर पथारीवाल्यांचे साम्राज्य असते. नागरिकांना पायी चालणे देखील अवघड असते. चतुर्थीच्या दिवशी चिंचवडगावात रस्त्यावरील अतिक्रमणांचा कहर दिसून येतो.

क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य अधिकारी संजीव खोत, अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम, स्थापत्य अभियंता देवान्ना गुट्टूवार यांच्याकडे या भागाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांचे या समस्येकडे दुर्लक्ष आहे. माजी महापौर अपर्णा डोके यांच्यासह अश्विनी चिंचवडे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे येथून जवळच राहतात. मात्र, या नगरसेवकांनाही या समस्येचे गांभीर्य नाही. वाहतूक विभागाचे पोलीस असून नसल्यासारखे आहेत. केवळ पावत्या फाडण्यात पोलिसांची तत्परता दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून पुतळ्याखालील भागात जनावरे आणून बांधली जातात.

काहीजण स्वयंपाक करताना दिसून येतात. काही व्यसनी नागरिकांचा हा ठिय्या बनला आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. या शिल्पसमूहाचे पावित्र्य राखले जावे, नागरिकांना पायी चालता येईल असे रस्ते मोकळे असावेत, अतिक्रमणे दूर करावीत, अशी नागरिकांची जुनी मागणी आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही.

 

चापेकर चौकातील अतिक्रमणांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, तेथे पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे दिसून येते. यापुढे ही कारवाई तीव्र करण्यात येईल. पोलीस उपलब्ध झाले की, कारवाई केली जाते. पूर्वी पोलीस मिळत नव्हते, आता ते मिळतात. या व्यावसायिकांशी कोणाचेही लागेबांधे नाहीत, आर्थिक हितसंबंध नाहीत. कारवाईची पूर्वसूचना त्यांना दिली जात नाही. या व्यावसायिकांना कोणाचेही राजकीय पाठबळ नाही.

संदीप खोत, क्षेत्रीय अधिकारी, ‘ब’ प्रभाग, चिंचवडगाव