टपऱ्या, स्टॉल आणि खाद्यपेयांच्या हातगाडय़ा यांचे बेसुमार अतिक्रमण आणि त्यामुळे निर्माण होत 15Tapari3असलेले अनेक प्रश्न असे चित्र रास्ता पेठेत असून या अतिक्रमणांकडे महापालिकेच्या कोणत्याही विभागाकडून कधीही लक्ष दिले जात नाही अशी परिस्थिती आहे.
रास्ता पेठेतील भाजी मंडईचा परिसर हा जणू फक्त अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांसाठीच असल्यासारखी परिस्थिती आहे. येथील भाजी मंडई जुनी असली तरी ही मंडई फक्त रस्त्यावरच भरते आणि त्यामुळे येथून वाहन चालवणे दूरच; पण पायी चालणेही अवघड होते. या ठिकाणी अनेक वाहनचालक भाजी विक्रेत्यांच्या पुढेच त्यांचे वाहन उभे करून भाजी खरेदी करत असतात. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. भाजी मंडईच्या अतिक्रमणाबरोबरच या भागात झालेल्या खाद्यपदार्थाच्या गाडय़ांचेही मोठे अतिक्रमण संपूर्ण परिसरात झालेले पहायला मिळते. मराठी, दक्षिणी आणि उत्तर भारतीय खाद्य पदार्थ विकणाऱ्या हातगाडय़ा येथे मोठय़ा संख्येने लावल्या जातात. येथील मुख्य चौकापासूनच्या सर्व रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी या गाडय़ा लागतात.
रास्ता पेठेतील ही खाद्य गाडय़ांची गर्दी वाढत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा शिल्लक राहात असेल तेथे नव्या गाडय़ाही लगेच सुरू केल्या जात असल्याचे या भागात दिसते. या गाडय़ा सकाळपासूनच सुरू होतात आणि तेव्हापासून ते रात्री उशिरापर्यंत गाडय़ांचा व्यवसाय सुरू असतो. या गाडय़ांच्याच जोडीने या भागात भाजी आणि फळे यांची विक्री करणाऱ्या गाडय़ा रस्त्याच्या कडेने उभ्या असतात. त्यांचेही अतिक्रमण येथे सतत असते. रास्ता पेठेत अशी अतिक्रमणे झालेली असली, तरी सर्व व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहेत.