दांडेकर पुलाजवळील नव्याने बांधण्यात आलेल्या सुवर्णनंदा सोसायटी भिंत पडून तीन महिलांचा मृत्यू प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अभियंता इमरान इकबाल सवार (वय २३, रा. डेक्कन जिमखाना, मूळ सातारा) याला अटक केली आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विनय मुळे व इतरांचा शोध सुरू आहे.
दांडेकर पुलाकडून दत्तवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुवर्णानंद पार्क नावाची सोसायटीची संरक्षक भिंत पडून १६ जून रोजी रात्री मीरा शिरीष आठले, माधवी श्रीकांत पांघरकर आणि शारदा यशवंत माजिरे या तीन महिलांचा मृत्यू झाला होता. या सोसायटीचे बांधाकाम ए. व्ही. मुळे कन्स्ट्रक्शन कंपनीचे असून या सोसायटीची संरक्षक भिंत ही दगडमातीची असून ती केव्हाही पडू शकते, याची माहिती असताना देखील त्या भिंतीवर नवीन बांधकाम करून ती वाढविली. ही भिंत कोसळल्यामुळे तीन महिलांचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बिल्डर, ठेकेदार आणि अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून अभियंता सवार याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता या गुन्ह्य़ासंदर्भात महत्त्वाची कागदपत्रे गोळा करायची आहेत. फरार आरोपींना अटक करायची आहे. यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.