12 August 2020

News Flash

नोकरी सोडून घरपोच तयार पीठ पोहोचवण्याचा अभियंत्याचा व्यवसाय

हिंजवडीलगतच्या परिसरातील नागरिकांसाठी ऑनलाइन सुविधा

हिंजवडीलगतच्या परिसरातील नागरिकांसाठी ऑनलाइन सुविधा

पिंपरी: आकर्षक पगाराची नोकरी सोडून एका संगणक अभियंत्याने तयार पीठ (दळण) घरपोच देण्याचा ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी स्वतंत्र अ‍ॅपसह सुसज्ज यंत्रणा तयार केली आहे. या सुविधेमुळे हिंजवडी, रावेत, वाकड, पिंपळे सौदागरसह लगतच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरदारांसह इतरांचीही मोठी सोय होणार आहे. त्यांचा वेळ, श्रम आणि पैशाची बचत होणार आहे.

कृष्णा पवार, असे या अभियंत्याचे नाव आहे. अनेक वर्षांची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याचा त्यांचा पूर्वीपासूनच मानस होता. योग्य वेळ जुळून येत नव्हती. करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीच्या काळात सगळं जनजीवन ठप्प झाले, तेव्हा ऑनलाईनचे महत्त्व अधोरेखित झाले. स्वत:च्या मनातील व्यवसायासाठी हीच योग्य वेळ असल्याचे लक्षात घेऊन पवारांनी व्यवसायासाठी फ्लोअरपीक इन्फोटेक ही कंपनी स्थापन केली. गहू, बाजरी, ज्वारी तसेच सर्व प्रकारच्या डाळींचे तयार पीठ िहजवडी परिसरात घरपोच पोहोचवण्याचे वितरण त्यांनी २ जुलैपासून सुरू केले.

या नव्या व्यवसायासाठी पवारांनी स्वतंत्र अ‍ॅप तयार केले. परिसरातील १० गिरणी चालकांची भेट घेऊन ही संकल्पना समजावून सांगितली. एकमेकांना मदतच होईल, याची खात्री देऊन त्यांनाही यात सामावून घेण्यात आले. सदरचे अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्याबरोबरच याबाबतची सविस्तर माहिती परिसरातील नागरिकांना करून देण्यात आली. या कामासाठी पाच कुरिअर बॉय नियुक्त करण्यात आले. ग्राहकांनी अ‍ॅपद्वारे नोंदणी केल्यानंतर ही मुले मागणीप्रमाणे तयार पीठ घरी नेऊन देण्याचे काम करतात. या सशुल्क सुविधेमुळे नोकरदार महिला, एकटे राहणारे वृद्ध नागरिक अशा सर्वानाच श्रम, वेळ आणि पैशाच्या बचतीचा अनुभव येत आहे.

करोनामुळे गर्दी टाळणे अनिवार्य झाले आहे. दैनंदिन जीवनात असे तयार पीठ घरपोच पोहोचवण्याची सुविधा उपयुक्त ठरेल.  ज्येष्ठ नागरिकांसाठी याची चांगली मदत होईल.

– बन्सीलाल उरफाटे, ज्येष्ठ नागरिक, रहाटणी

मोबाईल अ‍ॅप तसेच संकेतस्थळाद्वारे ग्राहकांना आपली मागणी नोंदवता येणार आहे. करोनाच्या संकटकाळात गर्दीत जाणे टाळण्यासाठी नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वानाच ही सुविधा उपयुक्त ठरेल. गिरणीचालक व्यावसायिक भागीदार राहतील. अनेकांना रोजगारही उपलब्ध होईल. डिसेंबपर्यंत व्यवसाय वृध्दी होईल.

– कृष्णा पवार, कंपनी संचालक, रावेत

टाळेबंदीमुळे गिरणी व्यवसाय अडचणीत आला होता. दळणाचे काम मिळत नव्हते. बराच काळ गर्दीत थांबावे लागत असल्याने नागरिक टाळाटाळ करत होते. या ऑनलाईन सुविधेमुळे गिरणीचालकांना काम मिळू लागले, थेट वितरण सुविधा असल्याने गर्दीचा प्रश्नच येणार नाही.

– सुरज पिल्ले, गिरणीचालक, वाकड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:15 am

Web Title: engineer leave job and doing business of delivering home made flour zws 70
Next Stories
1 Coronavirus : रुग्ण बरे होण्याचे पुण्यातील प्रमाण राज्यात सर्वाधिक
2 सीमकार्ड अद्ययावत करण्याच्या बतावणीने ११ लाखांचा गंडा
3 पुणे : मास्क न घातल्याने पोलिसांच्या तावडीत सापडला खुनी
Just Now!
X