पुणे शहर परिसरातील हिंजवडी, चाकण, रांजणगाव, खराडी भागात झालेल्या औद्योगिक विकासामुळे या भागात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे देशभरातील अनेक युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. भोपाळमधील अभिषेक शरद्चंद्र रॉय हा अभियंता युवक दोन वर्षांपूर्वी नगर रस्त्यावरील एका बहुराष्ट्रीय कंपनीत रुजू झाला. वाघोली भागात तो मित्रासोबत सदनिकेत राहात होता. अचानक पहाटेच्या वेळी अभिषेकची किंकाळी त्याच्या मित्राला ऐकू आली. पाहतो तर काय, अभिषेक जिन्यात रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. त्यानंतर अभिषेकच्या खुनाचा तपास सुरू झाला. त्याचा खून चोरीच्या उद्देशातून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अभिषेकच्या कुटुंबीयांना त्याचा खून हा पूर्वनियोजित कट असल्याचे वाटते. ग्रामीण पोलिसांकडून या गुन्हय़ाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र अभिषेकच्या खुनाचे गूढ अद्याप कायम आहे..

पुणे शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात झालेल्या औद्योगिक विकासामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. एकेकाळी शांत असलेल्या भागात गुन्हेगारी वाढली आहे. रात्री- अपरात्री बहुराष्ट्रीय कंपनीतील कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तळेवडे आयटी पार्क भागात झालेल्या अंतरा दास या संगणक अभियंता युवतीच्या खुनामागचे गूढ अद्याप उकलले नाही. पोलिसांकडून या गुन्हय़ाचा तपास सुरू आहे. हिंजवडीतील आयटी पार्कपासून काही अंतरावर असलेल्या मारुंजी भागात तीन वर्षांपूर्वी झालेल्या संगणक अभियंता युवकाच्या खुनाचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यामुळेच की काय, भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून परक्या शहरात येणाऱ्या युवकांनी थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे.

भोपाळमधील ‘भेल’ या कंपनीत कामाला असलेल्या शरद्चंद्र रॉय यांचा मुलगा अभिषेकने अभियांत्रिकी शाखेचा अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर त्याने नोकरीचा शोध सुरू केला. पुण्यातील नगर रस्त्यावरील एका बहुराष्ट्रीय कंपनीत त्याला नोकरीची संधी मिळाली. अभ्यासात गती असलेल्या अभिषेकला पहिल्या प्रयत्नात बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाल्याने त्याच्या कुटुंबीयांना आनंद झाला होता. १ जून २०१५ रोजी तो पुण्यात आला. कंपनीपासून काही अंतरावर असलेल्या वाघोली भागात त्याचा मित्र राहायला होता. त्यामुळे त्याने वाघोलीत राहण्यास पसंती दिली. ३ जून २०१५ रोजी रात्री अभिषेक, त्याचा मित्र सिद्धार्थ घरात झोपले होते. त्या वेळी त्यांचा मित्र कुमार रात्रपाळी असल्याने कामाला गेला होता. पहाटे चारच्या सुमारास अभिषेकच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. गाढ झोपेत असलेला सिद्धार्थ झोपेतून जागा झाला. सदनिकेचा दरवाजा उघडा होता. उघडय़ा दरवाजातून त्याने बाहेर डोकावून पाहिले तर अभिषेक जिन्यात रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. घाबरलेल्या सिद्धार्थने त्वरित या घटनेची माहिती सदनिकेचे मालक योगेश सातव यांना दिली. त्याला तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच तो मरण पावला होता.

त्यानंतर या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. चोरटय़ांना प्रतिकार करताना अभिषेकला चाकूने भोसकण्यात आल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला होता. अभिषेकच्या छातीवर चाकूने वार करण्यात आला होता. लोणीकंद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. चोरटय़ांना पकडण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. या संदर्भात पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले, की घटनास्थळाची पाहणी पोलिसांकडून करण्यात आली होती. चोरटय़ांना प्रतिकार करताना अभिषेकचा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता. त्या अनुषंगाने पोलिसांकडून ग्रामीण भाग तसेच अहमदनगर जिल्हय़ातील चोरटय़ांच्या हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले होते. पोलिसांनी चोरटय़ांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांकडून त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात आली होती. मात्र, चौकशीत तसेच तांत्रिक तपासात काही निष्पन्न झाले नाही. पोलिसांकडून या गुन्हय़ाचा तपास करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, चोरटय़ांचा माग काढण्यास पोलिसांना अपयश आले.

दरम्यान, एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर शरद्चंद्र रॉय हे पुण्यात आले होते. त्यांनी अभिषेकचा शवविच्छेदन अहवाल मिळवला होता. अभिषेकचा खून झाला असून तो पूर्वनियोजित कट असल्याचा संशय रॉय यांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी चोरीच्या उद्देशातून खून झाल्याचा दावा केला होता. रॉय यांच्या मते पोलिसांनी केलेला दावा चुकीचा आहे.

रॉय यांनी या संदर्भात तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. अभिषेकसोबत राहणाऱ्या मित्रांची सत्यशोधन चाचणी (लाय डिटेक्टर टेस्ट) करण्याची मागणी त्यांनी केली होती. अभिषेकच्या खुनाचा छडा लावण्याची मागणी त्यांनी केली होती. दोन वर्षांनंतरही अभिषेकच्या खुनामागचे गूढ कायम आहे.