अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे वर्ष आशादायक ठरणार असून, महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कॅम्पस प्लेसमेंटला अधिक चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक महाविद्यालयांची कॅम्पस प्लेसमेंट्सची सुरुवात चांगली झाली असून या वर्षी सरासरी वेतनही वाढल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट्सला मंदीचा मोठा फटका बसला होता. कॅम्पस प्लेसमेंट्सच्या बाबतीत अनेक महाविद्यालयांच्या पदरी गेल्या वर्षी निराशाच आली होती. मात्र, नवे वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नवी आशा घेऊन आले आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट्सची सुरुवात चांगली झाल्याचे दिसत आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये पन्नास टक्क्य़ांहून अधिक विद्यार्थ्यांना नोक ऱ्या मिळाल्याचे दिसत आहे. मोठय़ा कंपन्यांनी गेल्या वर्षी कॅम्पस प्लेसमेंट्स करण्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये अगदी जुलै-ऑगस्टपर्यतही कॅम्पस इंटरव्ह्य़ू घ्यावे लागले होते. मात्र, या वर्षी पहिल्याच टप्प्यामध्ये आशादायक चित्र दिसत आहे. त्यामुळे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ८० ते १०० टक्के प्लेसमेंट्स होण्याची महाविद्यालयांना आशा आहे.
पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (सीओईपी) आतापर्यंत ४६५ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट्सच्या माध्यमातून नोक ऱ्या मिळाल्या आहेत. त्यामध्ये १८० विद्यार्थ्यांच्या हातात दोन नोक ऱ्या आहेत. सीओईपीमध्ये आतापर्यंत किलरेस्कर कंपनीने सर्वाधिक म्हणजेच वर्षांला ३७ लाख ५० हजार रुपये पगार दिला आहे. विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (व्हीआयटी) साधारण ५०० विद्यार्थ्यांना नोक ऱ्या मिळाल्या आहेत. व्हीआयटीमध्ये आतापर्यंत वार्षिक १३ लाख ५० हजार रुपये वार्षिक हा सर्वाधिक पगार ठरला असून मॉर्गन स्टेनले कंपनीने तो दिला आहे. पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये (पीआयसीटी) साधारण २०० विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये नोकरी मिळाली आहे. पीआयसीटीमध्ये जपानच्या ऑकल्ट कंपनीने वार्षिक ३० लाख रुपयांचे पॅकेज दिले आहे. कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय आणि पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (पीव्हीजी) मायक्रोसॉफ्टने सर्वाधिक पगार दिले आहेत. कमिन्समध्ये वार्षिक १० लाख रुपये, तर पीव्हीजीमध्ये वार्षिक १६ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
वेतनाची सरासरी वाढली
गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पगाराची सरासरी रक्कम वाढली आहे. महाविद्यालयांमध्ये सरासरी साडेचार ते पाच लाखांपर्यंत कंपन्या पगार देत आहेत. गेल्या वर्षी कंपन्यांचा प्रतिसाद कमी होता. त्याचा परिणाम पगारावरही झालेला दिसत होता. गेल्या वर्षी वार्षिक पगाराची सरासरी साडेतीन ते चार लाख होती. या वर्षी मोठय़ा रकमेची पॅकेजेस दिसत नसली, तरी सरासरी पगार वाढला आहे आणि नोकरी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे, असे कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख रोहिणी मुळे यांनी सांगितले.
याबाबत पीआयसीटीचे प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. गिरीश मुंदडा यांनी सांगितले, ‘आमच्याकडे दोन टप्प्यांमध्ये आम्ही प्लेसमेंट करतो. पाच लाख वार्षिक पगार देणाऱ्या कंपन्या आणि तीन ते पाच लाख वार्षिक पगार देणाऱ्या कंपन्या अशा दोन गटांमध्ये आम्ही वर्गीकरण करतो. या वर्षी पाच लाखांपेक्षा अधिक पगार देणाऱ्या कंपन्या जास्त होत्या. आमच्याकडे एक तृतीयांश विद्यार्थ्यांना पाच लाखांपर्यंत अधिक पगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये नोक ऱ्या मिळाल्या आहेत.’
नव्या कंपन्यांचा अधिक प्रतिसाद
या वर्षी नव्या कंपन्यांनी आणि मध्यम स्तरातील कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट्सला खऱ्या अर्थाने आधार दिला आहे. या वर्षी नव्या कंपन्यांकडून अधिक प्रतिसाद आणि चांगले पगार दिले जात असल्याचे महाविद्यालयांनी सांगितले. चांगले पगार आणि विद्यार्थ्यांना अपेक्षित असेलेले काम नव्या कंपन्या देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचाही कल या कंपन्यांमध्ये काम करण्याकडे दिसत आहे, असे निरीक्षण पीव्हीजीचे प्लेसमेंट विभागाचे प्रमुख अविनाश पोरे यांनी सांगितले. ‘कंपन्यांच्या गेल्या वर्षीच्या अडचणी आता कमी झाल्या आहेत. हळूहळू बाजारपेठ स्थिरावत आहे. मात्र, मोठय़ा कंपन्या अजून पूर्णपणे सावरलेल्या नसल्यामुळे मध्यम स्तरातील कंपन्या आणि नव्या कंपन्यांचा प्रतिसाद अधिक आहे. मोठा ब्रँड नसला, तरी चांगले पगार असल्यामुळे विद्यार्थी या कंपन्यांकडे वळत आहेत,’ असे व्हीआयटीचे प्लेसमेंट विभागाचे प्रमुख ए. एस. कुलकर्णी यांनी सांगितले.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही फायदा
अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या (एम.ए किंवा एम.टेक) विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट्समध्ये कमी संधी मिळत असल्याचे गेले दोन-तीन वर्षे दिसत आहे. या वर्षीही हा ट्रेंड कायम आहे. मात्र, तरीही परिस्थितीत तुलनेने सुधारणा दिसत आहे, असे सीओईपीचे प्लेसमेंट विभागाचे प्रमुख संदीप मेश्राम यांनी सांगितले. मेश्राम म्हणाले, ‘पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस मधून नोकरी मिळण्याच्या संधी या वर्षी तुलनेने चांगल्या दिसत आहेत. विशेषत: वाहन उद्योग क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी एकूणातच आयटी, कॉम्युटर, इलेक्ट्रॉलिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स या क्षेत्रातील कंपन्यांचा प्रतिसाद अधिक आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल या क्षेत्रातील कंपन्यांचा प्रतिसाद  एकूणात कमी असला, तरी तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढला आहे. या क्षेत्रातील कंपन्या विद्यार्थी कमी घेतात. मात्र, पगार चांगले असतात. याचा फायदा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल.’