पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या ऑनलाईन परीक्षांना आता विद्यार्थ्यांनीच विरोध केला आहे. या परीक्षा पद्धतीमुळे अभियंता होण्यासाठी आवश्यकता असलेल्या कौशल्यांची चाचणी होत नाही, असे म्हणणे विद्यार्थ्यांनी मांडले आहे. साधारणपणे सहाशे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पद्धत बंद करण्याबाबतचे पत्र पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना दिले आहे.
पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या सत्र परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतात. बहुपर्यायी प्रकारच्या या ऑनलाईन परीक्षांना पन्नास टक्के प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तृतीय वर्षांच्या परीक्षांसाठीही पन्नास गुणांच्या सत्र परीक्षांची जबाबदारी पूर्णपणे महाविद्यालयांवर देण्यात आली आहे. या परीक्षा घेण्याच्या प्रकारामध्येही अनेक त्रुटी आहेत. या पाश्र्वभूमीवर आता विद्यार्थ्यांनीच या परीक्षांना विरोध केला आहे.
‘सध्या सुरू असलेल्या परीक्षा पद्धतीमध्ये आमच्यातील अभियांत्रिकी कौशल्यांची योग्यप्रकारे चाचणी होत नाही. त्यामुळे काम करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्येही विकसित होत नाहीत. परिणामी पुणे विद्यापीठाची पदवी अभियंता म्हणून प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येईल, त्यावेळी सक्षमतेने दिलेले काम करू शकू का, याबद्दल साशंकता वाटते,’ अशा भावना विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिलेल्या पत्रामध्ये व्यक्त केल्या आहेत. ‘ऑनलाईन परीक्षांच्या दरम्यान इंटरनेट सुविधा असल्यामुळे विद्यार्थी सर्रास कॉपी करतात, या परीक्षांच्या दरम्यान महाविद्यालयातीलच पर्यवेक्षक असल्यामुळे ते गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बहुतेक वेळा पुढाकार घेत नाहीत. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्नावली दिली जाते. काही महाविद्यालयांमध्ये प्रश्नपत्रिकेचे दोन किंवा चारच संच असतात आणि परीक्षा २ किंवा ४ बॅचमध्ये घेतली जाते. त्यामुळे पहिल्या बॅचमध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून पुढील प्रत्येक बॅचमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना कल्पना दिली जाते. या प्रश्नावलीमध्ये अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात आल्यामुळे शेवटच्या बॅचची परीक्षा होईपर्यंत प्रश्नपत्रिका जवळपास फुटलेली असते. प्रश्नांची काठिण्यापातळीही वाढत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार वर्गवारी होऊ शकत नाही. या परीक्षांना पन्नास टक्के प्राधान्य दिल्यामुळे यापूर्वी निकाल २० ते ३० टक्क्य़ांपर्यंत लागायचे त्याचे प्रमाण आता ८० ते ९० टक्के झाले आहे,’ असे काही मुद्दे विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांची ऑनलाईन परीक्षा पद्धत बंद करण्यात यावी. त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्षांसाठीही महाविद्यालयीन सत्र परीक्षेचे २० टक्केच गुण ग्राह्य़ धरण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.