थकलेले वेतन मागितले म्हणून संस्थेने नोकरीवरुन कमी केल्याची नोटीस दिल्याने संतप्त झालेल्या प्राध्यापकाने आपली अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळल्याचा प्रकार समोर आला. सूजर बाळासाहेब माळी असे या प्राध्यापकाचे नाव असून, गेल्या दीड वर्षांपासून ते वारजे येथील सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये काम करत आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्रे जाळल्याची चित्रफीत त्यांनी समाजमाध्यमांद्वारे प्रदर्शित केली.

सिंहगड संस्थेतील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. थकीत वेतन मिळण्यासाठी प्राध्यापकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्राप्तिकर विभागाने गोठवलेली बँक खाती सुरु करण्याची संस्थेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली.

जवळपास वर्षभराचे वेतन मिळालेले नाही. घरी आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा असे कुटुंब आहे. मात्र, वेतन मिळत नसल्याने आर्थिक, मानसिक ओढाताण होत आहे. थकलेले वेतन मागितले म्हणून संस्थेने नोकरीवरुन कमी केल्याची नोटीस दिली.

संस्थेचे व्यवस्थापन शिक्षकांना किंमत देत नाही. नीट वागणूकही देत नाही. सिंहगडच्या प्राध्यापकांना तर घरासाठी बँकेकडून कर्जही मिळत नाही. वेतनाचा प्रश्न न्यायालयात असल्याने तो कधी सुटेल याची कल्पना नाही.

शिक्षणमंत्री, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, तंत्रशिक्षण संचालनालयाकडे तक्रारी करुनही काही घडत नाही, अशी भावना सूरज माळी यांनी व्यक्त केली आहे.

शिक्षकी पेशा सोडणार

सध्या शिक्षणाच्या क्षेत्रात दयनीय अवस्था आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून काम करणे अडचणीचे होऊन बसले आहे. वेगळे काय करायचे याचा काहीही विचार केलेला नाही. मात्र, शिक्षक म्हणून पुन्हा काम करणार नाही, एवढे नक्की आहे, असेही माळी यांनी सांगितले.