राहुल खळदकर rahul.khaladkar@expressindia.com

सुरुवातीला डेक्कन पोलीस ठाण्यात या प्रकरणात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र आता विद्यार्थ्यांचा मृत्यू हा अपघात होता का खून हे उलगडण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

एरंडवणे भागात आठ महिन्यांपूर्वी एका सदनिकेत मृतावस्थेत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी सुरूवातीला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन गेल्या महिन्यात डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आठ महिन्यांपूर्वी स्वच्छतागृहात पडून गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडलेल्या त्या विद्यार्थ्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांचा मृत्यू हा अपघात होता का खून हे उलगडण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

मूळचा मध्यप्रदेशातील छिंदवाडा शहरातील रहिवासी असलेला सौरभ सतीश गोंडाणे (वय २८) पुण्यात शिक्षणासाठी आला होता. सौरभ अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत होता. तो जानेवारी महिन्यात पुण्यात आला होता. एरंडवणे भागातील उदय हौसिंग सोसायटीत सौरभ आणि त्याच्या बरोबर असलेले सांगलीतील पाच जण भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन राहात होते. ३ मार्च २०१८ रोजी सौरभ पहाटे स्वच्छतागृहात पडल्याचे त्याच्या बरोबर राहणाऱ्या मित्रांच्या निदर्शनास आले. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.

या प्रकरणात सुरुवातीला डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. स्वच्छतागृहात पडल्याने सौरभच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. दुखापतीनंतर मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता सुरूवातीला खासगी रूग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सौरभचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला होता. याप्रकरणात शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला नव्हता. वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांचे मत किंवा अभिप्राय राखून ठेवला होता. गेल्या महिन्यात शवविच्छेदन अहवाल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय विचारात घेऊन या प्रकरणी डेक्कन पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सौरभच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय पुण्यात आले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान,सौरभचा मृत्यू संशयास्पद आहे. त्याचा खून झाल्याचा संशय पालकांकडून व्यक्त करण्यात आला. सौरभच्या पालकांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची भेट घेतली आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली होती.  त्यानंतर या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, या साठी हा तपास सिंहगड पोलीस ठाण्याकडे सोपविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सेनगावकर यांनी दिले.

सौरभ गोंडाणे याच्या अकस्मात मृत्यूप्रकरणी सुरूवातीला डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सौरभच्या आई-वडिलांनी त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार केली. शवविच्छेदन अहवालात त्याच्या डोक्याला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. सौरभ पडला, का त्याला मारहाण करण्यात आली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सौरभला कोणते व्यसन होते का, हे देखील पडताळून पाहावे लागणार आहे. सौरभ गंभीर जखमी अवस्थेत तो राहत असलेल्या सदनिकेतील स्वच्छतागृहात पडल्याचे त्याच्या मित्रांनी पाहिले. याप्रकरणात सौरभबरोबर राहणाऱ्या मित्रांकडे चौकशी करण्यात येणार आहे.

संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलिसांना तपासावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते यांच्याकडे याप्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालातील मत तसेच त्याच्या पालकांनी केलेल्या मागणीनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासदेखील करण्यात येत आहे. सौरभच्या मृत्यूमागचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.  या प्रकरणात पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सौरभचा मृत्यू अकस्मात आहे किंवा त्याचा खून झाला, या निष्कर्षांप्रत पोलीस पोहोचलेले नाहीत, असे सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी स्पष्ट केले.