अभियांत्रिकीच्या विशेष प्रवेश फेरीसाठी तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालयांमधील रिक्त जागा सोमवारी जाहीर केल्या आहेत. मात्र, आतापर्यंत झालेल्या प्रवेशाचे कट ऑफ जाहीर न केल्यामुळे अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
अभियांत्रिकीच्या शासकीय महाविद्यालये, अनुदानित महाविद्यालयांमधील ३१२ रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी घेण्यात येत आहे. सोमवारपासून ही फेरी सुरू झाली आहे. तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला. मात्र, आधीच्या प्रवेश फेऱ्यांचे शाखानिहाय कट ऑफ गुण जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी), मुंबईचे व्हिजेटीआय, लोणेरेचे तंत्रशिक्षण विद्यापीठ, अंधेरी येथील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांमध्येही काही शाखांच्या जागा रिक्त आहेत.
महाविद्यालयांमधील काही शाखांसाठी अवघ्या १ किंवा २ जागा रिक्त आहेत. या फेरीत पर्याय दिलेले महाविद्यालय मिळाल्यास आधी मिळालेल्या प्रवेशावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे कमी जागा शिल्लक असलेल्या शाखांसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना आतापर्यंतचे कट ऑफ गुणही लक्षात घ्यावे लागणार आहेत. या फेरीसाठी अर्ज करण्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. प्राथमिक प्रवेश यादी ७ ऑगस्टला जाहीर होणार असून ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचे आहेत.