छत्तीसगड येथून नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या तीन तरूणांची सुटका झाल्यानंतर गडचिरोली पोलिस त्या तरूणांना घेऊन बुधवारी पुण्यात पोहोचले.गडचिरोली पोलिसांनी त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.त्यांची तीन तास चौकशी करून पोलिसांनी तिघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
भारत जोडो मोहिमेअंतर्गत आदर्श पाटील, विलास वाळके, श्रीकृ ष्ण शेवाळे या महाविद्यालयीन तरूणांनी महाराष्ट्र-छत्तीसगड-ओदीशा सायकल फेरी काढली. छत्तीसगड येथील चिंतलनार या गावानजीक नक्षलवाद्यांनी या तिघांचे अपहरण केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न  सुरू केले. रविवारी ( ३ जानेवारी )या तिघांची सुटका नक्षलवाद्यांनी केली. छत्तीसगड पोलिसांनी तिघांना गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना घेऊन पोलिसांचे पथक बुधवारी (६ जानेवारी ) पुण्यात पोहोचले.
पाटील, वाळके आणि शेवाळे यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस आयुक्तालयात या तिघांची तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर या तिघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी त्यांची चौकशी केली.मात्र,याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

पत्रकारांशी बोलण्यास मज्जाव
नक्षलवाद्यांनी सुटका केल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी या तिघांना पत्रकारांशी संवाद साधण्याची परवानगी दिली. पाटील, वाळके, शेळके यांना पुणे पोलिस आयुक्तालयात आणल्यानंतर चौकशी केल्यानंतर या तिघांना पत्रकारांशी बोलण्याची परवानगी दिली जाईल,असे पोलिसांनी सांगितले. मात्र,चौकशी झाल्यानंतर या तिघांना पत्रकारांसोबत संवाद साधण्याची परवानगी दिली नाही. त्यांना कुटंबीयांच्या ताब्यात सोपवले आणि मोटारीत बसवून या तिघांना बंदोबस्तात रवाना केले.